नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीची अधिसूचना निघण्याच्याही आधी भाजपला तिसऱ्यांदा सत्तेत येण्याचा ठाम विश्वास असून ‘मोदी ३.०’तील संकल्पित कामांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी आढावा घेतला. सत्तेत आल्यानंतर पहिल्या १०० दिवसांतील कृती आराखड्यावर मंत्रीपरिषदेत चर्चा झाल्याची माहिती आहे. याशिवाय पंतप्रधानांनी आपल्या मंत्र्यांचे ‘बौद्धिक’ घेतल्याचेही सांगितले जात असून प्रचारावेळी वादविवादापासून दूर राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

गेल्या महिन्यामध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोदींनी कॅबिनेट मंत्र्यांना शंभर दिवसांचा कृती आराखडा सादर करण्याच्या सूचना केल्या होत्या. लोकसभा निवडणुकीच्या तयारीत पक्ष व्यग्र असला तरीही केंद्राची विकासकामे अथक सुरू राहिली पाहिजेत, असा संदेश मोदींनी दिला होता. मंत्रीपरिषदेच्या निमित्ताने त्यांनी पुन्हा विकासाच्या मुद्द्यालाच प्राधान्य दिले आहे. त्यासंदर्भात त्यांनी सुमारे तासभर मार्गदर्शन केल्याचे समजते. जूनमध्ये केंद्रात नवे सरकार स्थापन झाल्यानंतर पुढील शंभर दिवसांचा कृती आराखडा तातडीने अमलात आणण्याची सूचनाही करण्यात आल्याचे समजते.

‘विकसित भारत-२०४७’ संकल्पनेचे सविस्तर सादरीकरण यावेळी केले गेले. त्याचा पुढील पाच वर्षांचा कृती आराखडाही मंत्र्यांसमोर मांडला गेला. त्यासाठी सर्व केंद्रीय मंत्र्यांकडून माहिती-विदा गोळा केला गेला आहे. तसेच मंत्रालयांशी निगडीत विभाग-संस्था, राज्य सरकारे, निमसरकारी संस्था, उद्याोग क्षेत्रांतील संस्था-संघटना, संशोधन संस्था, बुद्धिजीवी अशा अनेकांशी सल्ला-मसलत करण्यात आली होती. डिसेंबर २०२१ ते जानेवारी २०२४ या काळात २७०० बैठका झाल्या. यात साडेचारशे सूचनांचा गांभीर्याने विचार केला गेला. त्याआधारावर विकसित भारताचा कृती आराखडा तयार करण्यात आल्याचे सांगितले जाते. आगामी काळात विकसित भारत संकल्पनेवर चर्चासत्रे आयोजित केली जाणार असून लोकांना कृती आराखड्याची माहिती दिली जाणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मतदारांना संदेश!

पुढील दोन आठवड्यांमध्ये लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. निवडणुकीची चाहुल लागली की केंद्र सरकारच्या कामांचा वेग कमी होतो. मात्र मोदींनी विकसित भारतावर चर्चा करून एकप्रकारे केंद्रात पुन्हा भाजपचे सरकार स्थापन होईल, असा संदेश मतदारांना देण्याचा प्रयत्न केल्याचे मानले जात आहे.