PM Narendra Modi Meets Keir Starmer in Mumbai : ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर दोन दिवसीय भारत दौऱ्यावर आले आहेत. ते सध्या मुंबईत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (९ ऑक्टोबर) त्यांची भेट घेतली. ब्रिटनचे पंतप्रधान झाल्यानंतर स्टार्मर यांचा हा पहिलाच भारत दौरा आहे. दरम्यान, मोदी व स्टार्मर यांच्या भेटीनंतर दोघांनी एक संयुक्त निवेदन जारी केलं आहे. स्टार्मर यांना भेटल्यानंतर पंतप्रधान मोदी म्हणाले, “भारत व ब्रिटन नैसर्गिक भागीदार आहेत. उभय देशांमधील भागीदारी ही जागतिक स्थिरता व आर्थिक प्रगतीसाठी एक महत्त्वाचा आधार बनली आहे.”
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “पंतप्रधान स्टार्मर यांच्या नेतृत्वाखाली भारत व ब्रिटनच्या संबंधांमध्ये उल्लेखनीय अशी प्रगती झाली आहे. यावर्षी जुलै महिन्यात मी ब्रिटनच्या दौऱ्यावर गेलो होतो. तेव्हा आम्ही ऐतिहासिक अशा व्यापक आर्थिक व व्यापार करारावर (CETA) स्वाक्षरी केली. या करारामुळे दोन्ही देशांमध्ये होणाऱ्या आयातीवरील खर्च कमी होईल. उभय देशांमधील तरुणांना रोजगाराच्या नव्या संधी मिळतील, व्यापार वाढेल आणि यातून आपल्या उद्योगांना व ग्राहकांना फायदा होईल.”
भारताचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांना म्हणाले, “दोन्ही देशांमध्ये करार झाल्यानंतर काहीच महिन्यात तुमचा हा भारत दौरा मैत्री घट्ट करणारा आहे. या दौऱ्यात तुमचं आतापर्यंतचं सर्वात मोठं व्यावसायिक प्रतिनिधीमंडळ सहभागी झालं आहे. हे नव्या जोशाचं प्रतीक आहे.”
लोकशाही व स्वातंत्र्य हाच भारत-ब्रिटनमधील संबंधांचा पाया : नरेंद्र मोदी
पंतप्रधान मोदी म्हणाले, “भारत व ब्रिटन नैसर्गिक भागीदार आहेत. लोकशाही, स्वातंत्र्य व कायद्याचं राज्य यांसारख्या मूल्यांवरील परस्पर विश्वास हा आपल्या संबंधांचा खरा पाया आहे. जागतिक अस्थिरतेच्या या युगात भारत व ब्रिटनमधील ही वढती भागीदारी जागतिक स्थिरता व आर्थिक प्रगतीचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ आहे.”
पंतप्रधान मोदी यांनी सांगितलं की “आजच्या बैठकीत आम्ही इंडो-पॅसिफिक, पश्चिम आशिया व युक्रेनमधील संघर्षाच्या स्थितीत तिथे शांतता व स्थिरता कशी निर्माण करता येईल यावर चर्चा केली. युक्रेन संगर्ष, गाझा पट्टीत चालू असलेल्या युद्धाच्या मुद्द्यांवर भारत संवाद व शांततेच्या प्रयत्नांना पाठिंबा देतो. यापुढेही भारत या प्रयत्नांना हातभार लावेल. इंडो-पॅसिफिक क्षेत्रात सुरक्षा वाढवण्यास भारत कटीबद्ध आहे.”