नवी दिल्ली : सेमिकंडक्टर उद्योग क्षेत्राची उलाढाल येत्या काही वर्षांत एक ट्रिलियन डॉलरहून अधिक होईल आणि यात भारताचा महत्त्वाचा वाटा असेल, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी येथे केले. भारतात बनलेली एक छोटीशी चिप नवीन तंत्रज्ञानातील बदलांना दिशा देणारी ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त करतानाच ‘सेमिकंडक्टर राष्ट्र’ बनण्याकडे भारताची वेगाने वाटचाल सुरू आहे, असे ते म्हणाले.
‘सेमिकॉन इंडिया’ परिषदेचे उद्घाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते मंगळवारी नवी दिल्लीतील यशोभूमी प्रदर्शन केंद्रात पार पडले. यावेळी केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव, दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता, केंद्रीय वाणिज्य व उद्योग राज्यमंत्री जितिन प्रसाद यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
‘खनिज तेल हे काळे सोने आणि सेमिकंडक्टर चिप डिजिटल डायमंड असल्याचे मानले जाते’ असे सांगत मोदी पुढे म्हणाले, ‘तेलाने मागच्या शतकाला आकार दिला आणि आता ती शक्ती एका छोट्याशा चिपमध्ये एकवटली आहे.’ आज ६०० अब्ज डॉलर इतके मूल्य असलेले सेमिकंडक्टर उद्योगक्षेत्र येत्या काही वर्षांत एक ट्रिलियन डॉलरच्या पुढे जाईल, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.
भारताने २०२१मध्ये सेमिकंडक्टर कार्यक्रम सुरू केला आणि २०२३मध्ये पहिल्या सेमिकंडक्टर प्रकल्पाला मंजुरी दिली. त्यानंतर गेल्या दोन वर्षांत भारतातील दहा प्रकल्पांमध्ये दीड लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होत आहे. मायक्रॉन आणि टाटा या कंपन्यांनी प्रायोगिक तत्त्वावरील चिपची निर्मिती आधीच केली आहे आणि याच वर्षी भारतातील पहिली व्यावसायिक चिप दाखल हाेईल, अशा शब्दांत पंतप्रधानांनी भारताच्या सेमिकंडक्टर प्रगतीचे वर्णन केले. ‘सेमिकंडक्टर क्षेत्रात वेग अतिशय महत्त्वाचा आहे. म्हणूनच केंद्र सरकारने सेमिकंडक्टर निर्मिती क्षेत्रासाठी एकल खिडकी योजना आणली असून त्याद्वारे झटपट मंजुऱ्या दिल्या जात आहेत. देशात ‘प्लग ॲण्ड प्ले’ तत्त्वावर सेमिकंडक्टर पार्क उभारण्यात येत आहेत. त्या ठिकाणी जमीन, वीज, पायाभूत सुविधा, बंदरे, विमानतळ, कुशल मनुष्यबळ पुरवण्यात येत असून उद्योजक आणि गुंतवणूकदारांसाठी आकर्षक सवलतीही दिल्या जात आहेत. त्यामुळे भारतात या उद्योगाची भरभराट निश्चित असून ‘सेमिकंडक्टर राष्ट्र’ बनण्याकडे भारताची वाटचाल सुरू आहे, असे मोदी म्हणाले.
दुर्लभ खनिजांसाठीही प्रयत्नशील
सेमिकंडक्टरसाठी आवश्यक ‘डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर’चा पाया दुर्लभ खनिजांवर आधारित आहे. ती या क्षेत्रासाठीची सर्वात आव्हानात्मक बाब असून भारत त्यावरही काम करत आहे. त्यासाठी राष्ट्रीय क्रिटिकल मिनरल मिशनची स्थापना करण्यात आली आहे, असे मोदी म्हणाले. आपल्या देशाला लागणारी खनिजे देशातच मिळावीत, यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी सांगितले.
२५ सेमिकंडक्टर उत्पादन निर्मितीला प्रोत्साहन
सेमिकंडक्टर क्षेत्रातील २५ उत्पादने देशांतर्गत निर्मित व्हावीत, यासाठी केंद्र सरकारने ‘रचना आधारित प्रोत्साहन’ योजना लागू केली असल्याची माहिती केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या कार्यक्रमादरम्यान दिली. आजघडीला पोलादाचा वापर जसा वेगवेगळ्या क्षेत्रांतील उत्पादनांच्या निर्मितीत होतो, तसेच महत्त्व सेमिकंडक्टरला प्राप्त असून वाहने, फ्रीज, स्कूटर, मोबाइल फोन यांच्यासारख्या असंख्य उत्पादनांमध्ये सेमिकंडक्टरचा वापर वाढावा आणि त्यांची निर्मिती भारतात व्हावी, यासाठी ही योजना आणल्याचे त्यांनी सांगितले.
भारतात बनलेल्या पहिल्या चिपचे अनावरण
केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या कार्यक्रमात भारतात बनलेली पहिलीवहिली चिप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सादर केली. ‘विक्रम’ असे या ३२ बिट प्रोसेसरयुक्त चिपचे नाव असून ती इस्रोच्या सेमिकंडक्टर प्रयोगशाळेत तयार करण्यात आली आहे. या चिपचा वापर आरोग्य, वाहतूक, दूरसंचार, संरक्षण अशा विविध क्षेत्रांतील यंत्रणांमध्ये करता येऊ शकतो.
