पंतप्रधान मोदींनी शेअर केली डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १९४८ सालच्या भाषणाची प्रत; म्हणाले,…

पंतप्रधान मोदींनी नागरिकांना संविधान दिनाच्या शुभेच्छाही दिल्या आहेत.

२६ जानेवारी १९५० या दिवशी भारत प्रजासत्ताक झाला म्हणून तो ‘प्रजासत्ताक दिन’ हे साऱ्यांनाच माहीत असते. परंतु या प्रजासत्ताकाची रूपरेषा ज्या संविधानाने किंवा राज्यघटनेने ठरवली, ते संविधान आपण- भारतीय लोकांनी- ‘अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वत:प्रत अर्पण’ करण्याचा दिवस म्हणजे २६ नोव्हेंबर १९४९. आज भारतीय राज्यघटनेस ७१ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १९४८ सालच्या भाषणाची प्रत शेअर केली आहे.

आपल्या ट्वीटमध्ये या भाषणाच्या प्रतीचा फोटो शेअर करत पंतप्रधान मोदी म्हणाले, आपल्या नागरिकांना संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. या खास दिवशी डॉ. आंबेडकरांच्या भाषणाचा काही भाग शेअर करत आहे. ४ नोव्हेंबर १९४८ रोजी संविधान सभेत त्यांनी मसुदा समितीपुढे संविधानाचा मसुदा स्वीकारण्याचा प्रस्ताव मांडला.

भारतीय राज्यघटनेची रचना अतिशय परिश्रमपूर्वक सिद्ध झाली आहे. भारतीय राज्यघटनेचा खर्डा किंवा मसुदा, २६ नोव्हेंबर १९४९ रोजी घटना समितीकडून स्वीकारला गेला. या घटना समितीने १६६ दिवस काम केले. राज्यघटनेचा मसुदा तयार करण्यासाठी दोन वर्षे अकरा महिने व अठरा दिवस एवढा कालावधी लागला. ‘‘घटना समितीने सुचविलेली भारतीय राज्यघटना संमत करावी.’’ हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेला एका ओळीचा प्रस्ताव, विस्तृत चर्चेअंती टाळ्यांच्या गजरात संमत केला गेला.

हेही वाचा – राज्यघटनेची सांस्कृतिक जाणीव!

त्याच्या आदल्याच दिवशी, म्हणजे २५ नोव्हेंबर १९४९ रोजी घटना समितीच्या बैठकीत डॉ. आंबेडकरांनी केलेले भाषण आजही महत्त्वाचे ठरते. ‘‘२६ जानेवारी १९५० रोजी भारत एक प्रजासत्ताक देश बनू पाहत आहे. या दिवसापासून देशातील नागरिकांना स्वत:चे, स्वत:ने चालवलेले, स्वत:साठीचे सरकार मिळणार आहे. माझ्या मनामध्ये एक शंका जरूर उद्भवत आहे – या देशाच्या सार्वभौम राज्यघटनेचे पुढे काय होईल? दुसरी शंका- हा देश सार्वभौम राज्यघटना जपू शकेल की परत हरवून बसेल? या दोन्ही शंका माझ्या मनात काहूर उठवत आहेत.’’, असे ते या भाषणात म्हणाले होते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Pm narendra modi shared speech of dr babasaheb ambedkar on constitution day vsk