Former US Deputy Secretary of State slams Donald Trump for anti-India stance: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत रशियाकडून कच्च्या तेलाची आयात करतो म्हणून भारतीय आयातीवर ५० टक्के टॅरिफ लादल्यानंतर, अमेरिकन राजकीय वर्तुळात दोन्ही बाजूंनी टीकेची लाट उसळली आहे. अमेरिकेचे माजी उप-परराष्ट्रमंत्री कर्ट कॅम्पबेल यांनी सीएनबीसी इंटरनॅशनलला दिलेल्या मुलाखतीत ट्रम्प यांच्या भारतावरील टॅरिफ धोरणावर टीका केली. ते म्हणाले की, या टॅरिफमुळे अमेरिका-भारत संबंध आता धोक्यात आले आहेत.

“अमेरिकेचे २१व्या शतकातील सर्वात महत्त्वाचे संबंध भारताशी आहेत. त्यापैकी बरेच काही आता धोक्यात आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि पंतप्रधान मोदींबद्दल ज्या पद्धतीने बोलले आहे, त्यामुळे भारत सरकार अडचणीत आले आहे”, असे ते म्हणाले.

“मोदींनी ट्रम्प यांच्यासमोर गुडघे टेकू नयेत”

कर्ट कॅम्पबेल यांनी यावेळी भारताला सल्ला दिला की, “पंतप्रधान मोदींनी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यासमोर गुडघे टेकू नयेत.” रशियाशी असलेल्या संबंधांबाबत अमेरिकेने भारतावर दबाव आणण्याचे उलट परिणाम होऊ शकतात. “जर तुम्ही भारताला सांगितले की रशियाशी असलेल्या संबंधांचा त्याग करावा लागेल, तर भारतीय रणनीतीकार अगदी उलट करतील,” असे कॅम्पबेल पुढे म्हणाले.

अमेरिकेसाठी सर्वात महत्त्वाचे नाते म्हणजे…

२१व्या शतकात तंत्रज्ञान, शिक्षण आणि लष्करी सहकार्याच्या बाबतीत, अमेरिकेसाठी सर्वात महत्त्वाचे नाते म्हणजे अमेरिका आणि भारत यांच्यातील संबंध आहेत, हे त्यांनी अधोरेखित केले आणि “त्यातील बरेचसे संबंध आता धोक्यात आहेत”, असेही ते म्हणाले.

टॅरिफ वाद मिटल्याशिवाय

अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने गुरुवारी स्पष्ट केले की, “भारत हा एक धोरणात्मक भागीदार आहे”, आणि टॅरिफ वादामुळे दोन्ही देशांमधील संबंध तणावपूर्ण असतानाही अमेरिका भारताशी “पूर्ण आणि स्पष्ट संवाद” करत आहे.

भारतीय आयातीवरील टॅरिफ दुप्पट करण्याच्या निर्णयानंतर, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले की, टॅरिफ वाद मिटल्याशिवाय भारताशी कोणत्याही व्यापार वाटाघाटी होणार नाहीत.

स्वतःचा नाश करत आहेत

अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ आणि जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाचे प्राध्यापक स्टीव्ह हँके यांनी एनडीटीव्हीला सांगितले की, डोनाल्ड ट्रम्प जगाविरुद्ध व्यापार युद्ध सुरू करून “स्वतःचा नाश” करत आहेत. “ट्रम्प यांचा टॅरिफ निर्णय पूर्णपणे कचरा आहे”, असेही त्यांनी स्पष्टपणे म्हटले.