सोलांग खोरे, हिमाचल प्रदेश : पूर्वीच्या काँग्रेस सरकारने केवळ निवडणुकांवर डोळा ठेवून त्यांना वाटत असतानाही कृषी सुधारणा राबवण्याचे धाडस दाखवले नाही. आमच्या सरकारने मात्र शेतकरी कल्याणासाठी कृषी सुधारणा राबवणारे कायदे केले असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी सांगितले.

रोहतांग खिंडीतील अटल बोगद्याचे उद्घाटन केल्यानंतर आयोजित दुसऱ्या एका सभेत मोदी बोलत होते. ते म्हणाले की, जे लोक आज कृषी कायद्यांविरोधात निदर्शने करत आहेत त्यांना शेतकऱ्यांना मागील शतकात न्यायचे आहे. आमच्या सरकारने मध्यस्थांवरच निशाणा साधल्याने आता विरोधकांना धक्का बसला आहे. काँग्रेसने २०१९ च्या लोकसभा निवडणूक जाहीरनाम्यात याच कायद्यांचे आश्वासन दिले होते.

नवीन कामगार कायद्यांचे फायदे असल्याचे सांगून ते म्हणाले की, आत्मनिर्भर भारतासाठी आमचे प्रयत्न आहेत. मागील शतकातील निर्बंध या शतकात चालणार नाहीत.