Operation Sindoor India Pakistan News Updates ऑपरेशन सिंदूरची कारवाई झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशाशी संवाद साधला. पाकिस्तान विरोधातल्या ऑपरेशन सिंदूरला स्थगिती दिली आहे. ते संपलेलं नाही पाकिस्तानवर आमची नजर आहे. जर पाकिस्तानने आगळीक केली तर असंच उत्तर देण्यात येईल असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे. तसंच पाकिस्तानला तीन कठोर इशारे दिले आहेत.

पाकिस्तानला मोदींनी कोणते तीन इशारे दिले?

पहिला इशारा – यापुढे भारतावर दहशतवादी हल्ला झाला, तर सडेतोड उत्तर दिलं जाईल. आम्ही आमच्या पद्धतीने, आपल्या अटींवर उत्तर देणारच. दशतवादाची मूळं जिथे गाडली आहेत त्याच भागांवर आम्ही कारवाई करणार

दुसरा इशारा– कोणतंही आण्विक ब्लॅकमेल भारत सहन करणार नाही. त्याचा आधार घेऊन वाढणाऱ्या दहशतवादावर भारत घातक हल्ला करणार.

तिसरा इशारा- आपण दहशतवाद्यांना पोसणारं सरकार आणि दहशतवाद्यांचे म्होरके यांना वेगळं मानणार नाही. ऑपरेशन सिंदूरदरम्यान जगानं पाकिस्तानचं ते निंदनीय सत्य पाहिलं आहे जेव्हा मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांना शेवटचा निरोप देण्यासाठी पाकिस्तानी सैन्याचे मोठमोठे अधिकारी उपस्थित होते. राज्य पुरस्कृत दहशतवादाचा हा मोठा पुरावा आहे. आपण भारत आणि भारतीय नागरिकांना कोणत्याही धोक्यापासून वाचवण्यासाठी सातत्याने निर्णायक पावलं उचलत राहू. युद्धाच्या मैदानावर आपण प्रत्येक वेळी पाकिस्तानला चारीमुंड्या चित केलं आहे. यावेळी ऑपरेशन सिंदूरनं नव्या पद्धतीला सुरुवात केली आहे. आपण वाळवंट व डोंगराळ भागात आपल्या क्षमता सिद्ध केल्या आहेत. त्याचबरोबर न्यू एज वॉरफेअरमध्ये आपल्या क्षमता सिद्ध केल्या आहेत. या मोहिमेत आपल्या भारतीय बनावटीच्या शस्त्रास्त्रांची क्षमता सिद्ध झाली आहे. आज जग पाहात आहे की २१ व्या शतकाती युद्धनीतीत भारतीय बनावटीच्या शस्त्रास्त्रांची वेळ आली आहे. सर्व प्रकारच्या दहशतवादाविरोधात आपल्या सगळ्यांचं एकत्र राहणं, आपली एकता आपली सर्वात मोठी शक्ती आहे. नक्कीच हे युग युद्धाचं नाही. पण हे युग दहशतवादाचंही नाही.

पाकिस्तानचे दहशतवादीच एक दिवस त्यांना नष्ट करतील-मोदी

दहशतवाद आता भारत सहन करणार नाही. पाकिस्तानचं सरकार दहशतवाद्यांना ज्या प्रकारे पोसतं आहे त्यावरुन हे दिसतं आहे की हे दहशतवादी एक दिवस पाकिस्तानला संपवतील. पाकिस्तानला त्यांचा दहशतवादी ढाचा उद्ध्वस्त करावा लागेल. टेरर आणि टॉक एकत्र चालणार नाही. पाणी आणि रक्ताचे पाटही एकत्र वाहणार नाही. आज मी सगळ्या जगाला सांगतो जर पाकिस्तानशी चर्चा करायची असेल तर ती पाकव्याप्त काश्मीर आणि दहशतवादी कारवाया यांच्यावरच होईल. आज बुद्ध पौर्णिमा आहे. भगवान बुद्धाने आपल्याला शांततेचा मार्ग दाखवला आहे. प्रत्येक भारतीयाला ही शांतता लाभली पाहिजे. विकसित भारताचं स्वप्न पूर्ण झालं पाहिजे यासाठी भारत शक्तिशाली असणं गरजेचं आहे. आवश्यक असल्यास या शक्तीचा प्रयोगही सक्तीचा ठरतो. मागच्या काही दिवसांमध्ये भारताने हेच केलं आहे. मी पुन्हा एकदा भारतीय सैन्य दलांना सशस्त्र दलांना सॅल्युट करतो असंही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.