पीटीआय, आक्रा
बदलत्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जागतिक प्रशासनात विश्वासार्ह आणि प्रभावी सुधारणांवर भर देत मजबूत भारत अधिक स्थिर आणि समृद्ध जगासाठी योगदान देईल, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी घानाच्या संसदेला संबोधित करताना केले. यासोबतच विकसनशील देशांना प्रतिसाद दिल्याशिवाय प्रगती होऊ शकत नाही, याकडेही पंतप्रधानांनी लक्ष वेधले. जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून, भारत हा जगाचा एक मजबूत आधारस्तंभ आहे. एक मजबूत भारत अधिक स्थिर आणि समृद्ध जग निर्माण करण्यात योगदान देईल, असे ते म्हणाले.
स्थिर राजकारण आणि प्रशासनाच्या पायावर भारत लवकरच तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल, असा आशावाद व्यक्त करीत दुसऱ्या महायुद्धानंतर निर्माण झालेली जागतिक शासन व्यवस्था वेगाने बदलत असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
एनक्रुमा यांना श्रद्धांजली
● पंतप्रधान मोदी यांनी गुरुवारी येथील क्वामे एनक्रुमा मेमोरियल पार्क (केएनएमपी) येथे घानाचे पहिले राष्ट्रपती आणि आफ्रिकन स्वातंत्र्य चळवळीचे नेते डॉ. क्वामे एनक्रुमाह यांना श्रद्धांजली अर्पण केली. घानाच्या उपराष्ट्रपती प्रोफेसर नाना जेन ओपोकू-अग्येमांग उपस्थित होत्या. या वेळी स्वातंत्र्य, एकता आणि सामाजिक न्यायासाठी एनक्रुमाह यांच्या योगदानाचे स्मरणही केले.
● १९५७मध्ये घानाला ब्रिटिश राजवटीपासून स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आणि पॅन-आफ्रिकन चळवळीत महत्त्वाची भूमिका बजावण्यासाठी ओळखले जाणारे एनक्रुमाह हे आफ्रिकन इतिहासातील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व होते.
पंतप्रधानांना राष्ट्रीय सन्मान
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या ‘विशिष्ट प्रशासन कौशल्य आणि प्रभावी जागतिक नेतृत्वा’साठी घानाचा ‘ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार ऑफ घाना’ हा राष्ट्रीय सन्मान प्रदान करण्यात आला. बुधवारी घानाचे अध्यक्ष जॉन ड्रामानी महामा यांच्याकडून सन्मानित करण्यात आले. हा सन्मान प्राप्त झाल्याचा अभिमान असल्याचे पंतप्रधानांनी ‘एक्स’वर मत व्यक्त केले. त्यांनी हा सन्मान दोन्ही देशांच्या युवकांच्या आकांक्षा आणि उज्ज्वल भविष्य, घाना आणि भारत यांच्यातील ऐतिहासिक संबंध, त्यांच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरा, विविधतेला समर्पित केला. या सन्मानाची जबाबदारी म्हणजे भारत-घाना मैत्री अधिक मजबूत करण्यासाठी काम करणे असे सांगत भारत नेहमीच घानाच्या लोकांसोबत उभा राहील आणि एक विश्वासू मित्र आणि विकास भागीदार म्हणून योगदान देत राहील, असे पंतप्रधान म्हणाले.