देशातील करोना रुग्णांची संख्या मागील दोन आठवड्यांमध्ये पुन्हा वाढत असल्याचं चित्र दिसत आहे. देशाची राजधानी असणाऱ्या दिल्लीमध्ये मागील दोन दिवसांमध्ये दिवसाला एक हजारहून अधिक रुग्ण आढळून आलेत. देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईमध्ये रविवारी विक्रमी १४४ रुग्ण आढळून आले आहेत. करोनाबाधितांची संख्या पुन्हा वाढत असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी परवा म्हणजेच २७ एप्रिल रोजी एक बैठक बोलावली आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून होणाऱ्या या बैठकीमध्ये सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना सहभागी होण्यास सांगण्यात आलंय.

देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांबरोबरच पंतप्रधान कार्यालयातील वरिष्ठ अधिकारीही या बैठकीमध्ये सहभागी होणार आहे. या शिवाय केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया आणि या दोन्ही मंत्रालयांचे वरिष्ठ अधिकारी या बैठकीमध्ये असतील. या बैठकीमध्ये करोना रुग्णसंख्येची वाढ रोखण्यासाठी राज्यांना निर्देश देण्याबरोबरच काही धोरणात्मक निर्णय घेतले जाण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.

समोर आलेल्या माहितीनुसार आरोग्य सचिव राजेश भुषण हे या बैठकीमध्ये सध्या देशातील करोना परिस्थितीसंदर्भात एक प्रेझेन्टेशन देणार आहेत. यामध्ये ते करोना लसीकरणासंदर्भात आणि विशेष करुन बुस्टर संदर्भात माहिती देणार आहेत. कोणत्या राज्यामध्ये सध्या काय परिस्थिती आहे याची सविस्तर आकडेवारी या बैठकीमध्ये सादर केली जाणार आहे.

यापूर्वीही पंतप्रधानांनी करोना परिस्थितीचा आढवा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांसोबत बैठकी घेतल्या आहेत. इतकच नाही तर वेगवेगळ्या जिल्ह्यांमधील प्रत्यक्ष परिस्थिती जाणून घेण्यासाठी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांसोबतही बैठक गेऊन करोना परिस्थितीचा आढावा घेतलाय. केंद्रीय आरोग्य मंत्र्यालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार करोना लसीकरणाची एकूण आकडेवारी १८८ कोटी ६७ पर्यंत पोहचली आहे. यापैकी २.५६ कोटी नागरिकांना पाहिला डोस देण्यात आला असून हा वयोगट १२ ते १४ वर्षांचा आहे.

भारतातील सक्रीय रुग्णसंख्या १५ हजार ८७३ वर पोहचली असल्याचं आरोग्य मंत्रालयाने म्हटलंय. आज सकाळी आठ वाजल्याच्या आकडेवारीनुसार ही संख्या जाहीर करण्यात आलीय. सक्रीय रुग्णसंख्या ही एकूण रुग्णसंख्येचे ०.०४ टक्के इतकी आहे. काल दिवसभरामध्ये करोनाचे दोन हजार ५९३ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. भारतामधील करोना बाधिकांची संख्या चार कोटी ३० लाख ५७ हजार ५४५ इतकी आहे.