पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ( १७ सप्टेंबर ) ७३ वा वाढदिवस साजरा करत आहेत. पंतप्रधान मोदींचा जन्म १७ सप्टेंबर १९५० रोजी गुजरातमधील वडनगर येथे झाला. दामोदरदास मोदी आणि हिराबा मोदी यांच्या सहा मुलांपैकी नरेंद्र मोदी हे तिसरे अपत्य आहेत. एका सामान्य कुटुंबातून आलेले पंतप्रधान मोदी आज जगातील सर्वात प्रभावशाली नेत्यांच्या यादीत सामील झाले आहेत.
पंतप्रधान मोदींच्या सार्वजनिक जीवनाची सुरूवात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ( आरएसएस ) प्रचारक म्हणून झाली. नंतर ते भारतीय जनता पक्षाचे नेते म्हणून उदयास आले. पंतप्रधान होण्यापूर्वी ते २००१ ते २०१४ दरम्यान १२ वर्षांहून अधिक गुजरातचे मुख्यमंत्री होते.
हेही वाचा : मोदी ‘विश्वगुरू’ आहेतच, कारण…
पंतप्रधानांच्या ७३ व्या वाढदिवसानिमित्त भाजपाने विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे. पंतप्रधान मोदींच्या वाढदिवशी विश्वकर्मा जयंतीही आहे. या निमित्त पंतप्रधान मोदींनी ‘विश्वकर्मा योजना’ सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून सोनार, लोहार, कुंभार, चांभार, नाभिक यांसारख्या १८ पारंपारिक कौशल्याचा व्यवसाय करणाऱ्यांना ३ लाखापर्यंत कर्ज मिळणार आहे. तर, गेल्या पाच वर्षात पंतप्रधानांनी आपला वाढदिवस कोणत्या पद्धतीने साजरा केला, याचा आढावा घेणार आहोत.
- २०२२ साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७२ व्या वाढदिवसानिमित्त नामिबियातून भारतात चित्ते आणण्यात आले. या चित्त्यांना पंतप्रधान मोदींनी मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात सोडलं होतं.
- २०२१ साली पंतप्रधान मोदींच्या ७१ व्या वाढदिवसानिमित्त भारताने एका विशेष अभियानाअंतर्गत २.२६ कोटी करोना लसीकरण केलं.
- २०२० साली देशात करोनाची लाट होती. तेव्हा भाजपाने पंतप्रधानांच्या ७० व्या वाढिदिवसानिमित्त सेवा पंधरवडा साजरा केला. भाजपा कार्यकर्त्यांनी देशात गरजू लोकांना रेशन वाटप आणि रक्तदान शिबिराचं आयोजन केलं होतं.
- २०१९ साली ६९ व्या वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर मोदींनी स्टॅच्यू ऑफ युनिटीचा दौरा केला होती. यावेळी पंतप्रधानांनी नर्मदा नदीची पूजा केली. यासह सरदार सरोवर धरणाचीही पाहणी केली. यानंतर अहमदाबादपासून २०० किलोमीटर दूर असलेल्या केवडिया शहरात एक सभेला मोदींनी संबोधित केलं.
- २०१८ साली पंतप्रधान मोदींनी आपला ६८ वा जन्मदिवस वाराणसी या त्यांच्या लोकसभा मतदारसंघात साजरा केला. दोन दिवस पंतप्रधान मोदी वाराणसीत होते. तेव्हा ५०० कोटींच्या विविध प्रकल्पांचं उद्घाटन मोदींनी केलं.