पीटीआय, बिकानेर

जेव्हा ‘सिंदूर’चे रुपांतर दारुगोळ्यात होते, तेव्हा काय होते, हे जगाने पाहिले. मोदींच्या नसांमध्ये रक्त नाही तर ‘गरम सिंदूर’ वाहते (मोदी की नासो में लहू नहीं, गरम सिंदूर बह रहा है) आणि यापुढे प्रत्येक दहशतवादी हल्ल्याची पाकिस्तानला जबर मोठी किंमत मोजावी लागेल, असा कठोर इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी दिला. देशभरातील विविध उपक्रमांच्या लोकार्पण कार्यक्रमानिमित्त येथे झालेल्या सभेत ते बोलत होते.

पहलगाम २२ एप्रिल रोजीच्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने प्रत्युत्तर म्हणून ‘ऑपरेशन सिंदूर’अंतर्गत पाकिस्तानातील दहशतवादी तळ नष्ट केले. पहलगाम हल्ल्याला एक महिना पूर्ण झाला असतानाच पाकिस्तान सीमेलगत बिकानेरमधील पलाना येथे गुरुवारी पंतप्रधानांची जाहीर सभा झाली. भारतीय लष्कराच्या कठोर कारवाईने पाकिस्तानला गुडघे टेकण्यास भाग पाडल्याचा पुुनरूच्चार पंतप्रधानांनी यावेळी केला. पहलगाम हल्ल्याला उत्तर देताना आम्ही पाकिस्तानातील नऊ सर्वांत मोठे दहशतवादी तळ केवळ २२ मिनिटांत उद्ध्वस्त केल्याचेही त्यांनी नमूद केले. दहशतवादी हल्ल्याला भारताने दिलेला प्रतिसाद हा सूडाचा खेळ नव्हता तर न्यायाचा एक नवा प्रकार होता. या पुढे पाकिस्तानशी कोणताही व्यापार होणार नाही; चर्चा केवळ पाकव्याप्त काश्मीरबद्दलच होईल आणि भारत अणुहल्ल्यांच्या धमक्यांना घाबरणार नाही याचा पुनरुच्चारही त्यांनी केला. देशात पुन्हा दहशतवादी हल्ला झाला तर त्याला योग्य प्रत्युत्तर दिले जाईल आणि या हल्ल्याची वेळ आणि पद्धती आपले सैन्य ठरवेल, असे पंतप्रधान म्हणाले. पाकिस्तान कधीही भारताविरुद्ध थेट युद्ध जिंकू शकत नाही. जेव्हा-जेव्हा युद्ध होते, तेव्हा पाकिस्तानला पराभवाला सामोरे जावे लागते. म्हणूनच पाकिस्तानने दहशतवादाला शस्त्र बनवले आहे, असा घणाघातही मोदी यांनी केला.

सैन्यदलांचे कौतुक

‘ऑपरेशन सिंदूर’ राबवल्याबद्दल सशस्त्र दलांचे कौतुक करताना मोदी म्हणाले, की ‘आमच्या सरकारने तिन्ही सशस्त्र दलांना मोकळीक दिली. त्यांनी मिळून असा सापळा रचला की पाकिस्तानला गुडघे टेकावे लागले. पाकिस्तानने बिकानेरमधील नल हवाई तळाला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांना त्याचे कोणतेही नुकसान करता आले नाही. याचाच दाखला देत, पाकिस्तानमधील रहिमयार खान हवाई तळ पुन्हा कधी उघडेल हे कोणालाही माहिती नाही. तो ‘आयसीयू’मध्ये आहे. भारताच्या हल्ल्याने तो तळ उद्ध्वस्त झाला आहे, असे मोदी यांनी अधोरेखित केले.

१०३ ‘अमृत भारत’ स्थानकांचे उद्घाटन

पंतप्रधानांच्या हस्ते देशाच्या विविध भागांमधील १०३ ‘अमृत भारत’ रेल्वे स्थानकांचे दूरस्थ पद्धतीने उद्घाटन करण्यात आले. विकसित भारतासाठी आधुनिक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी मोठे प्रयत्न सुरू असल्याचे सांगत, पंतप्रधान मोदी यांनी आधुनिकीकरणासाठी देशाच्या वचनबद्धतेवर भर दिला. ही १०३ रेल्वे स्थानके १८ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील ८६ जिल्ह्यांमध्ये असून त्यावर १,१०० कोटी रुपयांहून अधिक खर्च करण्यात आला आहे.

राजस्थानच्या भूमीवरून मी देशवासीयांना सांगू इच्छितो, की जे लोक ‘सिंदूर’ पुसण्यास निघाले होते ते पुसले गेले. ज्यांनी हिंदुस्थानचे रक्त सांडले त्यांनी त्याच्या प्रत्येक थेंबाची किंमत मोजली आहे. ज्यांना त्यांच्या शस्त्रांचा अभिमान होता, ते आता ढिगाऱ्याखाली गाडले गेले आहेत.- नरेंद्र मोदी, पंतप्रधान

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ट्रम्प यांच्या दाव्यांवर गप्प का – काँग्रेस

सार्वजनिक सभांमध्ये भव्य-दिव्य परंतु पोकळ फिल्मी संवाद बोलण्याऐवज पंतप्रधान मोदी यांनी विचारलेल्या गंभीर प्रश्नांची उत्तरे द्यावीत, असे आव्हान काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी दिले. बिकानेरच्या सभेत मोदींनी केलेल्या भाषणावर काँग्रेसने टीका केली. मोदी यांनी संसदेचे विशेष अधिवेशन बोलावावे आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत-पाकिस्तान युद्धबंदीच्या दाव्याबाबत स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणीही केली.