भाजपचे राष्ट्रीय नेते व केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या निधनाचे वृत्त पसरताच सकाळी साडेवाठ वाजेपासून  पक्षाच्या ११, अशोका रस्त्यावरील मुख्यालयात शोककळा  पसरली. कालपर्यंत लोकसभा निवडणुकीचा विजयी जल्लोष अनुभवणारी भाजप कार्यालयाची वास्तू आता अंत्यदर्शनासाठी सज्ज होत होती. गोपीनथ मुंडे यांचे पार्थिव १ वाजून २० मिनिटांनी भाजप मुख्यालयात आणण्यात आले. तिंरगा लपटलेल्या काचेच्या पेटीत मुंडेचे पार्थिव ठेवले होते.  नियतीने पंकजा व यशश्री या दोघा बहिणींवर आपले पिता गोपीनाथ मुंडे यांचे पार्थिव ‘माहेरी’ नेण्याची वेळ आणली.
अंत्यदर्शन घेण्यासाठी अलोट गर्दी जमली होती. जसजशी गर्दी वाढत होती तसतसे पंकजा यांच्या डोळ्यातील अश्रू वाढत होते. त्यांच्याशेजारी उभे असलेले विरोधी पक्षनेते विनोद तावडे खिन्नपणे हे सारे पाहत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी, ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, रा.स्व. संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, सरकार्यवाह भैय्याजी जोशी, काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह अनेक  नेत मुंडे यांच्या अंत्यदर्शनासाठी कार्यालयात येत होते.      ‘जबतक सूरज-चाँद रहेगा..’ अशा घोषणाही उमटत होत्या. पंतप्रधान मोदी १ वाजून पस्तीस मिनिटांनी मुख्यालयात दाखल झाले.   पंकजा यांच्या डोक्यावर हात मोदी यांनी त्यांचे सांत्वन केले. पंतप्रधानांनी आपल्या शोक संदेशात म्हटले  की, माझे मित्र गोपीनाथ मुंडे यांच्या अकस्मात जाण्याने मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या जाण्याने देशाचे व केंद्र सरकारचे मोठे नुकसान झाले आहे. मागास समाजातून पुढे येत त्यांनी मोठी उंची गाठली होती. शरद पवार, भाजपाध्यक्ष राजनाथ सिंह, प्रकाश जावडेकर, थावरचंद गेहलोत, केंद्रीय अर्थ मंत्री अरुण जेटली, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती ईराणी, अनंत कुमार, उत्तराखंडचे मुख्यमंत्री हरीश रावत, मीरा कुमार यांनी मुंडे यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले.  मनसेचे बाळा नांदगावकर, आमदार विनायक मेटे, भाजप प्रदेश उपाध्यक्ष गिरीश महाजन आदी खिन्न चेहऱ्याने उभे होते. राजनाथ सिंह म्हणाले की, भाजपने एका बडय़ा नेत्याला गमावले आहे.  शिवसेना नेते अनंत गीते म्हणाले की, मुंडे जिंदादिल स्वभावाचे होते. युतीत कोणताही पेचप्रसंग उद्भवला तरी ते हसतमुखाने त्यावर मात करीत. हेच त्यांचे वेगळेपण होते. केंद्रीय मंत्री रामविलास पासवान म्हणाले की, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आमची सोमवारी रात्री उशीरा चर्चा झाली होती. त्यांच्या अकस्मात निधनाने मला धक्का बसला आहे. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी व माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या वतीने मुंडे यांच्या  पर्थिवावर पुष्पचक्र अर्पण दुपारी २ वाजून २५ मिनिटांनी मुंडे यांचे पार्थिव मुंबईला नेण्यात आले.