टोक्यो : जपानच्या प्रभावी आणि सामथ्र्यशाली नेत्यांपैकी एक असलेले आणि सर्वाधिक काळ पंतप्रधानपदी राहिलेले माजी पंतप्रधान शिंझो आबे (वय ६७) यांची शुक्रवारी निवडणूक प्रचाराचे भाषण करताना गोळय़ा झाडून हत्या करण्यात आली.

पश्चिम जपानमधील नारा प्रांतात निवडणूक प्रचाराचे भाषण सुरू केल्यानंतर काही मिनिटांतच आबे यांच्यावर हल्लेखोराने पाठीमागून दोन गोळय़ा झाडल्या. त्यांना गंभीर अवस्थेत हवाई रुग्णवाहिकेने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले.  गोळय़ा झाडल्यामुळे आबे यांच्या हृदयाला, तसेच मानेला दोन गंभीर जखमा झाल्या. अतिरिक्त रक्त स्रावामुळे मुच्र्छितावस्थेत आबे यांना रुग्णालयात दाखल केले तेव्हा त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचे महत्त्वाचे अवयवही निकामी झाले होते.

जपानची सरकारी वाहिनी ‘एनएचके’ने या घटनेची चित्रफीत प्रक्षेपित केली आहे. नारा येथील रेल्वे स्थानकाबाहेर आबे भाषण करीत असतानाच हल्लेखोराने त्यांच्यावर गोळीबार केला. त्यानंतर ते खाली कोसळले. पोलिसांनी राखाडी शर्ट घातलेल्या एका संशयित आरोपीला झडप घालून पकडले. त्यावेळी त्याच्या हातातील बंदूकही जमिनीवर पडली. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नवा तेत्सुया यामागामी (४१) असे आहे. ‘एनएचके’च्या वृत्तानुसार आरोपीने तीन वर्षे सागरी संरक्षण दलात सेवा केली होती.

आबे यांना त्यांचे आजोबा माजी पंतप्रधान नोबुसुके किशी यांच्याकडून राजकारणाचा वारसा मिळाला. आजोबांच्या मार्गदर्शनाखाली त्यांची जडणघडण झाली. आबे यांनी आपल्या कारकीर्दीत जपानला लष्करीदृष्टय़ा अधिक सामथ्र्यवान बनविण्यावर भर दिला. आंतरराष्ट्रीय राजकारणात जपानचे महत्त्व कसे वाढेल, यावर त्यांनी लक्ष केंद्रित केले. दोन वर्षांपूर्वी प्रकृती अस्वास्थ्याच्या कारणास्तव त्यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला होता. अनेक ध्येये अपूर्ण असताना हे पद सोडणे अस्वस्थ करणारे असल्याचे त्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले होते.

पंतप्रधानपदाच्या कारकीर्दीत आबे यांनी जपानच्या अर्थव्यवस्थेला पुनरुज्जीवित केले. आशियामध्ये जपानची स्थिती मजबूत करण्यावर त्यांनी भर दिला. आबे हे जपानमधील सत्ताधारी लिबरल डेमोक्रॅटिक पक्षाचे प्रभावशाली नेते होते. त्यांची पक्षावर चांगली पकड होती. जपानचे विद्यमान पंतप्रधान फुमियो किशिदा यांच्या धोरणांवरही आबे यांचा मोठा प्रभाव आहे. त्यांनी काही वर्षांपूर्वी उत्तर कोरियाने अपहरण केलेल्या जपानी नागरिकांचा मुद्दा, रशियाबरोबरचा प्रादेशिक वाद आणि युद्ध-त्यागासंबंधीच्या घटनादुरुस्तीतील अडचणींचे निराकरण करण्यातील जपानच्या अपयशाविषयी आवाज उठवला होता. आबे यांनी २००६ मध्ये वयाच्या ५२व्या वर्षी जपानचे सर्वात तरुण पंतप्रधान होण्याचा मान मिळवला, परंतु त्यांचा पहिला कार्यकाळ एका वर्षांनंतर अचानक संपुष्टात आला. २०१२ मध्ये आबे पुन्हा पंतप्रधान झाल्यावर त्यांनी समर्थपणे देशाची अर्थव्यवस्था रुळावर आणणे, वित्तीय प्रोत्साहन, आर्थिक सुलभता आणि संरचनात्मक सुधारणांवर भर दिला.

आबे यांनी सहा राष्ट्रीय निवडणुका जिंकल्या आणि सत्तेवर मजबूत पकड बसवली. जपानची संरक्षक क्षमता आणि अमेरिकेबरोबरचे संरक्षण सहकार्य मजबूत केले. आबे यांच्या कट्टर राष्ट्रवादी धोरणांमुळे उत्तर कोरिया आणि चीनही नाराज होते. त्यांच्या कारकीर्दीत जपानच्या संरक्षणाच्या धोरणांवर अनेकांनी टीका केली. अमेरिका-जपानमधील मजबूत संबंधांमुळे त्यांच्या कार्यकाळात जपानच्या संरक्षण क्षमतेत लक्षणीय वाढ झाल्याचा त्यांच्या समर्थकांचा दावा आहे. तथापि, संरक्षण क्षेत्रासाठी आपल्या ध्येयांचा आग्रह धरणे आणि इतर वादग्रस्त मुद्दय़ांमुळे अनेक नेते आबे यांच्या विरोधात गेले.

आंतरराष्ट्रीय स्तरावर जपानचे वर्चस्व वाढवण्यासाठी आबे यांच्या प्रयत्नांचा आणि चीनच्या उदयाला विरोध करण्यासाठी अमेरिकेसह समविचारी लोकशाहीप्रणाली असलेल्या राष्ट्रांचा पािठबा मिळवण्याचे त्यांचे धोरण होते. त्यांच्या कार्यकाळातच अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी दुसऱ्या महायुद्धात अणुबॉम्ब हल्ला झालेल्या हिरोशिमाला भेट दिली होती. २०२०च्या ऑलिम्पिक यजमानपदाचा मानही आबे यांनी जपानला मिळवून दिला. अमेरिका-जपान संबंध दृढ केल्याबद्दल अमेरिकेत आबे यांचे कौतुक करण्यात आले. त्यांनी जपानची संरक्षण क्षमता मजबूत करण्यासाठी अमेरिकेला जवळ केल्याचे जाणकार सांगतात. चीन आणि उत्तर कोरियाशी तणावाच्या पाश्र्वभूमीवर जपानने या प्रदेशात ५० हजार अमेरिकी सैन्य तैनात करण्यास मदत केली.

जगभरातून निषेध

जगभरातील नेत्यांनी शिंझो आबे यांच्या हत्येचा निषेध केला आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मित्र गमावल्याबद्दल शोक व्यक्त केला. जपानचे पंतप्रधान डॉ. फुमुओ किशिदा यांनी हा हल्ला भ्याड आणि रानटी असल्याची टीका केली. जपानमधील विरोधी पक्षांच्या नेत्यांनी या हल्ल्याचा निषेध करत ही घटना जपानच्या लोकशाहीला आव्हान असल्याचे म्हटले आहे.

कठोर बंदूक र्निबध असूनही..

बंदूक खरेदी आणि वापर नियंत्रणाचे कठोर कायदे असलेल्या जगातील सर्वात सुरक्षित देशांमध्ये जपानचा समावेश होतो. तरीही हल्लेखोराने बंदूक मिळवून आबे यांची जाहीर सभेत हत्या केली. या घटनेने जपानी नागरिकांना विलक्षण धक्का बसला आहे.

पंतप्रधानपदाचा विक्रम

जपानचे दीर्घकाळ पंतप्रधानपद भूषवणारे नेते अशी शिंझो आबे यांची ओळख होती. आबे यांनी सहा राष्ट्रीय निवडणुका जिंकल्या आणि सत्तेवर मजबूत पकड बसवली. २०२० मध्ये प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला. १९६४ ते १९७२ पर्यंत दोन हजार ७९८ दिवस पंतप्रधान राहिलेल्या इसाकू सातो यांचा विक्रम आबे यांनी मोडला.