Kumar Vishwas Wife Manju Sharma: राजस्थान उच्च न्यायालयात सध्या सुनावणी चालू असलेल्या एका प्रकरणात प्रसिद्ध कवी कुमार विश्वास यांच्या पत्नी मंजू शर्मा यांचेही नाव आले आहे. हा खटला राजस्थान पब्लिक सर्व्हिस कमिशन अर्थात RPSC कडून घेतल्या जाणाऱ्या एका परीक्षेत झालेल्या गैरव्यवहारासंदर्भात आहे. या प्रकरणात आरोप ठेवण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर मंजू शर्मा यांनी RPSC च्या सदस्यत्वाचा राजीनामा जिला आहे. राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांना सोमवारी पाठवलेल्या पत्रामध्ये मंजू शर्मा यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.
“मी माझं संपूर्ण आयुष्य पारदर्शक आणि प्रामाणिकपणे काम करण्यासाठी घालवलं. पण एका नोकरभरतीच्या प्रक्रियेबाबत नुकत्याच उद्भवलेल्या एका वादामुळे माझी वैयक्तिक प्रतिमा आणि संपूर्ण राजस्थान लोकसेवा आयोगाच्या प्रतिमेला धक्का बसला आहे”, असं मंजू शर्मा यांनी पत्रात नमूद केलं आहे. RPSC च्या नियमानुसार सदस्यांची नियुक्ती ६ वर्षांसाठी होते. त्यानुसार, मंजू शर्मा यांचा कार्यकाळ ऑक्टोबर २०२६ पर्यंत होता.
माझ्याविरोधात कोणतेही प्रकरण प्रलंबित नाही – मंजू शर्मा
दरम्यान, आपल्याविरोधात आजतागायत एकही खटला वा पोलीस प्रकरण प्रलंबित नसल्याचंही त्यांनी पत्रात म्हटलं आहे. “माझ्याविरोधात कोणत्याही सरकारी यंत्रणेमार्फत कोणतीही चौकशी चालू नाही. मी कोणत्याही प्रकरणात आरोपीही नाही. पण तरीही, सार्वजनिक आयुष्यात मी कायम सच्चेपणाला प्राधान्य दिलं आहे. माझ्यालेखी राजस्थान लोकसेवा आयोगाचा सन्मान, तटस्थपणा आणि पारदर्शीपणाला सर्वाधिक महत्त्व आहे. त्यामुळे मी राजस्थान लोकसेवा आयोगाच्या सदस्यत्वाचा स्वत:हून राजीनामा देत आहे”, असंही त्यांनी पत्रात म्हटलं आहे.
अलाहाबाद उच्च न्यायालयाची मंजू शर्मांबद्दल टिप्पणी
दरम्यान, गेल्या आठवड्यात झालेल्या सुनावणीदरम्यान अलाहाबाद उच्च न्यायालयाने या प्रकरणात मंजू शर्मा व इतर आरोपींबाबत टिप्पणी केली आहे. “२०२१ साली झालेल्या सब इन्स्पेक्टर भरती प्रक्रियेत पेपर लीक होणे किंवा मुलाखत प्रक्रियेबाबत आधीच उमेवारांना माहिती देणे अशा प्रकारांमध्ये RPSC चे सदस्य आरोपी बाबू लाल कटारा, रामूराम राईका, मंजू शर्मा, संगीता आर्या, जसवंत राठी आणि संचालक संजय श्रोतिया यांचा प्रत्यक्ष सहभाग किंवा या गैरप्रकारांची त्यांना माहिती होती. असं करून त्यांनी परीक्षा प्रक्रियेच्या मूल्यांना धक्का पोहोचवला आहे”, असं न्यायालयाने २८ ऑगस्ट रोजी झालेल्या सुनावणीत म्हटलं होतं.
“अशा प्रकारे मंजू शर्मा, संगीता आर्या किंवा जसवंत राठी यांच्यासारख्या आयोगाच्या सदस्यांचाच गैरप्रकारांमध्ये सहभाग असणे ही बाब गंभीर आहे. पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रानुसार, आयोगातील इतर सदस्य त्यांच्या वैयक्तिक फायद्यासाठी गैरप्रकार करत असल्याची माहिती या सदस्यांना होती”, असंही न्यायालायाने नमूद केलं होतं.
मुलांच्या मुलाखतींसाठी संचालकांनीच टाकला शब्द?
दरम्यान, राजस्थान लोकसेवा आयोगाचे माजी संचालक रामूराम राईका यांनी मंजू शर्मा, संगीता आर्या व जसवंत राठी या सदस्यांशी आपल्या मुलांच्या मुलाखतींसंदर्भात चर्चा केली होती, असंही न्यायालयाने म्हटलं आहे. यातून RSPC मध्ये चालू असलेल्या भ्रष्टाचाराचाच खुलासा होत असून लेखी परीक्षा व मुलाखत या दोन्ही प्रक्रियांच्या विश्वासार्हतेला तडा गेला आहे, असं न्यायालयानं या सुनावणीदरम्यान नमूद केलं आहे.
मंजू शर्मा यांच्या नियुक्तीवेळीही झाला होता वाद
राजीनाम्याप्रमाणेच मंजू शर्मा यांच्या नियुक्तीवेळीही वाद झाला होता. ऑक्टोबर २०२० मध्ये मंजू शर्मांची RSPC च्या सदस्या म्हणून नियुक्ती झाली होती. तेव्हा राजस्थानमध्ये काँग्रेसचं अशोक गहलोत यांचं सरकार होतं. आम आदमी पक्षाचे संस्थापक सदस्य असणाऱ्या कुमार विश्वास यांच्या पत्नीला राज्य लोकसेवा आयोगात नियुक्ती दिल्यावरून काँग्रेसमधूनच अशोक गहलोत यांच्यावर आगपाखड करण्यात आली होती. कारण कुमार विश्वास काँग्रेस पक्ष व नेतृत्वाचे कडवे टीकाकार मानले जातात. शिवाय २०१४ साली त्यांनी अमेठीतून राहुल गांधींविरोधात निवडणूकदेखील लढवली होती.