scorecardresearch

म्हणून ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची पोलिसांकडून चौकशी होणार; सुनक यांनी माफी मागितली तरी..

सीट बेल्ट न वापरणे हे आपल्याकडे क्षुल्लक समजले जाते. पण ब्रिटनमध्ये तो दंडनीय अपराध आहे.

म्हणून ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची पोलिसांकडून चौकशी होणार; सुनक यांनी माफी मागितली तरी..
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी गाडीत बसताना सीट बेल्ट लावला नाही.

ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी सोशल मीडियासाठी एक व्हिडिओ बनविला होता. हा व्हिडिओ करत असताना ते गाडीत बसले आणि त्यांनी सीट बेल्ट काढला. आपल्यासाठी भारतात ही क्षुल्लक गोष्ट वाटू शकते, पण ब्रिटनच्या पंतप्रधानांवर या गोष्टीवरुन बरीच टीका झाली. ब्रिटनमध्ये सीट बेल्ट न लावणे हा दंडनीय अपराध असून ऋषी सुनक यांच्यावर कारवाई करण्यासाठी पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. अखेर ऋषी सुनक यांनी या घटनेला एरर ऑफ जजमेंट असे म्हणत आपली चूक स्वीकारली आणि दिलगिरी व्यक्त केली आहे.

पोलिस पंतप्रधानांचा शोध घेतायत

लँकशायर पोलिसांनी सांगितले की, आमच्यापर्यंत हा विषय आला आहे. त्यासंबंधी आमची चौकशी सुरु आहे. ब्रिटनमध्ये सीट बेल्ट न लावल्यास ५०० पाउंड (जवळपास ५० हजार रुपये) दंड भरावा लागतो. ब्रिटनच्या दंडाची तुलना आपल्या देशात केल्यास यासाठी ५० हजारांची पावती फाडावी लागेल.

हे ही वाचा >> BBC Documentary: इंग्लंडच्या पंतप्रधानांनी घेतली नरेंद्र मोदींची बाजू; पाकिस्तानी वंशाच्या खासदाराला सुनावले खडे बोल!

वाद उफाळल्यानंतर तो व्हिडिओ डिलीट केला

ब्रिटन सरकारचे प्रवक्ते जेमी डेव्हिस यांनी सांगितले की, ऋषी सुनक हे उत्तर पश्चिम इंग्लंडच्या दौऱ्यावर असताना त्यांनी इन्स्टाग्रामसाठी एक व्हिडिओ तयार केला. या व्हिडिओमध्ये त्यांनी कारमध्ये सीट बेल्ट काढला होता. ही एक एरर ऑफ जजमेंटची चूक होती. हा व्हिडिओ आता सुनक यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन हटविण्यात आला आहे. डेव्हिस पुढे म्हणाले की, आता पंतप्रधानांनी आपली चूक स्वीकारली असून दिलगिरी व्यक्त केली आहे. एवढंच नाही तर ऋषी सुनक यांनी स्वतः सुद्धा सीट बेल्ट लावलाच पाहीजे, असे निक्षून सांगितले.

विरोधकांकडून जोरदार टीका

ऋषी सुनक यांनी दौऱ्यावर असताना सरकारी योजनांसाठी निधी मिळावा यासाठी आवाहन करणारा एक व्हिडिओ तयार केला होता. हा व्हिडिओ तयार करत असताना त्यांच्याकडून अनावधानाने सीट बेल्ट काढला गेला. त्यानंतर विरोधक मजूर पक्षाकडून पंतप्रधानांवर जोरदार टीका करण्यात आली. पंतप्रधान ऋषी सुनक यांनी माफी मागितली असली तरी विरोधकांकडून टीका सुरुच आहे. मजूर पक्षाचे प्रवक्ते म्हणाले की, सुनक हे या देशातील नियम, डेबिट कार्ड, ट्रेन सेवा आणि अर्थव्यवस्थेचे नियम पाळण्यात अपयशी ठरत आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 20-01-2023 at 10:56 IST

संबंधित बातम्या