Uttar Pradesh : उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडामध्ये हुंड्यासाठी एका पतीने पत्नीला जिवंत जाळल्याची घटना चांगलीच चर्चेत आहे. निक्की भाटी या विवाहितेच्या मृत्यूच्या प्रकरणात अनेक ट्विस्ट समोर आहेत. पतीने पत्नीला हुंड्यासाठी जिवंत जाळल्याचा आरोप करण्यात येत आहे. हे प्रकरण ताज असतानाच आता उत्तर प्रदेशच्या अमरोहामध्ये आणखी एक गंभीर घटना घडली आहे.
हुंड्यासाठी पोलीस कॉन्स्टेबल पतीने पत्नीला जाळल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामध्ये महिला गंभीर जखमी झाली आहे. सुट्टीवर घरी आलेल्या एका पोलीस कॉन्स्टेबलने त्याच्या पत्नीला जिवंत जाळून मारण्याचा प्रयत्न केला. यामध्ये ती महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. या महिलेचं पारुल असं नाव असून तिच्या भावाने आरोपी पती पोलीस कॉन्स्टेबलसह, सासू, मेहुणे आणि इतर ६ जणांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.
हुंड्याच्या मागणीसाठी सासरच्यांनी आपल्या बहिणीला जाळून मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप पीडितेच्या भावाने केला आहे. वृत्तानुसार, पीडित महिला ही एका ग्रामीण आरोग्य केंद्रात परिचारिका आहे. तिची प्रकृती गंभीर असल्याने तिला आता दिल्लीतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अमरोहाच्या नारंगपूर गावात ही घटना घडली आहे. घटनेनंतर आरोपी कुटुंबातील सदस्य फरार झाले आहेत.
उत्तर प्रदेश पोलिसात हेड कॉन्स्टेबल असलेला पती देवेंद्र याची बरेली येथे नुकतीच बदली झाली होती. ही घटना घडली तेव्हा पती एका आठवड्याच्या रजेवर होता. मात्र, याचवेळी हुंड्याची मागणी पूर्ण न झाल्याने पती आणि सासरच्यांनी पीडितेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणाचा आता पोलीस तपास करत आहेत.
दरम्यान, पीडिचेच्या आईने म्हटलं की, “मंगळवारी पहाटे शेजाऱ्यांकडून आम्हाला या घटनेची माहिती मिळाली. त्यानंतर आम्ही घटनास्थळी पोहोचलो तेव्हा माझी मुलगी वेदनेनं तडफडत होती. पण खूप भाजली होती. त्यानंतर तिला आम्ही जवळच्या रुग्णालयात दाखल केलं. पण तिची प्रकृती गंभीर असल्याने तिला दिल्लीला हलवण्यात आलं आहे. तिची प्रकृती अजूनही गंभीर आहे. माझ्या मुलीचं देवेंद्र नावाच्या व्यक्तीशी लग्न झालं होतं. ती जुळ्या मुलांची आई आहे. तिला एक मुलगा आणि एक मुलगी आहे”, असं म्हटलं आहे.