अमेरिकेत सध्या मोठया प्रमाणात तणाव आहे. जॉर्ज फ्लॉयड या आफ्रिकन वंशाच्या नागरिकाच्या मृत्यूनंतर अमेरिकेच्या वेगवेगळया भागांमध्ये सुरु असलेला हिंसाचार अद्यापी थांबलेला नाही. नागरिक रस्त्यावर उतरुन हिंसक आंदोलने करत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सोमवारी व्हाईट हाऊसजवळ शांततेत निदर्शने करणाऱ्या आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांडया फोडल्या व रबरी गोळया झाडल्या. अमेरिकेत सुरु असलेला हा हिंसाचार थांबवण्यासाठी मोठया प्रमाणावर बळाचा वापर करण्याचा इशारा डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे. रॉयटर्सने हे वृत्त दिले आहे.

अमेरिकेतील मोठया शहरांमध्ये मागच्या सहा दिवसांपासून रात्रीच्यावेळी लुटमार आणि हिंसाचाराच्या घटना घडत आहेत. हे सर्व थांबवण्याचा निश्चय ट्रम्प यांनी बोलून दाखवला आहे. ट्रम्प यांना सोमवारी व्हाइट हाऊसजवळ असणाऱ्या सेंट जॉन चर्चमध्ये जायचे होते. तिथे जाण्याचा त्यांचा मार्ग मोकळा करण्यासाठी पोलिसांनी आंदोलकांवर कारवाई केली. अमेरिकेचे अ‍ॅटॉर्नी जनरल विलियम बारही त्यांच्यासोबत होते. चर्चमध्ये ट्रम्प यांनी फोटोसाठी काही पोझही दिल्या. व्हाइट हाऊसजवळ नॅशनल गार्ड मिलिट्री पोलीस, सिक्रेट सर्व्हीस, होमलँड सिक्युरिटी पोलिसांनी निदर्शकांवर कारवाई केली.

काय आहे प्रकरण ? अमेरिकेत का सुरु आहे हिंसाचार ?
जॉर्ज फ्लॉयड यांच्या मृत्यूनंतर अमेरिकेत हिंसाचार सुरु आहे. अमेरिकेच्या वेगवेगळया भागांमध्ये या आंदोलनाचे लोण पसरत चालले आहे. जॉर्ज फ्लॉयड या कृष्णवर्णीय नागरिकाचा सोमवारी मिनियापोलिस शहरातील पोलीस कोठडीत मृत्यू झाला. अधिकाऱ्याने जॉर्ज फ्लायड यांना अटक करताना त्यांच्या मानेवर गुडघा ठेवल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. व्हिडीओ व्हायरल झाल्यापासून अमेरिकेत शुक्रवारपासून आंदोलनं सुरु आहेत.

जॉर्ज फ्लॉयड यांच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या मिनियापोलिस शहरातील पोलीस अधिकाऱ्याला शुक्रवारी अटक करण्यात आली. त्याच्यावर हत्येचा आरोप ठेवण्यात आला आहे. पण त्याने आंदोलकांचे समाधान झालेले नाही. जवळपास १५ शहरांमध्ये आंदोलन सुरु असून अनेकांना अटकही करण्यात आली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Police fire rubber bullets tear gas to disperse protest near white house dmp
First published on: 02-06-2020 at 10:20 IST