फ्रान्स पोलिसांनी पॅरिसच्या ईशान्येकडील प्रकाशनगृहात आणि पूर्वेकडील सुपरमार्केटमध्ये शुक्रवारी धडक कारवाईत ‘शार्ली एब्दो’ दहशतवादी हल्लाप्रकरणातील तीनही अतिरेक्यांचा खातमा केला आणि ओलिसांची सुटका केली. या दुहेरी कारवाईमुळे ४८ तासांचे तणावपूर्ण कसोटीचे क्षण अखेरीस संपुष्टात आले. ठार झालेल्यांत शरीफ आणि सईद कुरेशी या दोघा कुख्यात भावांचा तसेच त्यांचा हस्तक एमेदी कॉलिबली यांचा समावेश आहे.
‘शार्ली एब्दो’ या व्यंग्यचित्रसाप्ताहिकावर बुधवारी झालेल्या हल्ल्यानंतर फ्रान्सभर आणि विशेषत: पॅरिसमध्ये बंदोबस्तात कमालीची वाढ झाली असतानाही दहशतवाद्यांच्या सूत्रबद्ध कार्यपद्धतीवर कोणताही परिणाम झाला नसल्याचे उघड झाले होते. बुधवारचा हल्ला शरीफ आणि सईद कुरेशी या दोघा भावांनीच घडविल्याचा पोलिसांचा तर्क होता. दहशतवादी पाश्र्वभूमी असलेल्या या दोघा भावांची छायाचित्रेही पोलिसांनी जारी केली होती. शुक्रवारी सकाळी या दोघांनी एक गाडी बळकावली आणि ही खबर मिळताच पोलिसांनी त्यांचा पाठलाग सुरू केला. हे दोघे भाऊ पॅरिसच्या ईशान्येकडील दामार्तिन-एन’गोल या औद्योगिक वसाहतीतील एका प्रकाशनगृहात घुसले. तेथे त्यांनी एकाला ओलीसही ठेवले. पोलीस तसेच लष्करी सैनिकांनी या प्रकाशनगृहाला सर्व बाजूंनी वेढा दिला आणि हवाई दलाची हेलिकॉप्टरही घटनास्थळी सज्ज झाली. विशेष म्हणजे या वसाहतीपासून पॅरिसचा विमानतळ अवघ्या १२ किलोमीटरवर असल्याने या दोघांचा पळ काढण्याचा मुळचा इरादा असावा मात्र त्यांनी गाडी बळकावल्याची खबर तात्काळ कळल्याने त्यांची योजना फसली, असा तर्क आहे. या दोघांशी पोलिसांनी दूरध्वनीवरून चर्चा केली तेव्हा आपण ‘वीरा’सारखे मृत्यूला सामोरे जायला तयार आहोत, अशी दर्पोक्ती त्यांनी केली होती. या कारवाईत पोलीस आणि सुरक्षा यंत्रणा गुंतली असतानाच पॅरिसच्या पूर्वेकडील कोशर या ज्यू सुपरमार्केटमध्ये कॉलिबलीने हल्ला चढवून बेछूट गोळीबार करीत दोघांची हत्या केली तर पाचजणांना ओलीस ठेवले. ओलिसांमध्ये लहान मुलांचाही समावेश होता. कुरेशी भावांना विनाअडथळा पळून जाता यावे, यासाठी कॉलिबलीने हे ओलीसनाटय़ घडविले होते. कुरेशी भावांशी त्याचा संबंधही उघड झाला आणि गुरुवारच्या गोळीबारात त्यानेच महिला पोलिसाची हत्या केल्याचेही उघड झाले. या दोन्ही ठिकाणच्या ओलीसनाटय़ाने पॅरिसमध्ये अशांतता धुमसत होती. संपूर्ण शहरालाच जणू रणभूमीचे स्वरूप आले होते. अनेक तास या ओलीसनाटय़ातून मार्ग निघत नव्हता. अखेरीस रात्री वैफल्यग्रस्त अतिरेक्यांनी पसार होण्याचा केविलवाणा प्रयत्न म्हणून गोळीबार करीत प्रकाशनगृहाबाहेर धाव घेतली. त्यांनी स्फोटही घडविले. सुरक्षा सैनिकांनी त्यांच्यावर प्रतिहल्ला चढवित त्यांना कंठस्नान घातले.
त्याचवेळी ज्यूंच्या कोशर सुपरमार्केटम ध्येही पोलिसांनी जोरदार धडक देत पाचजणांना ओलीस ठेवणाऱ्या अतिरेक्याला गोळ्या घातल्या.४ ओलीसही मृत्युमुखी?
पॅरिसमधील कोशर सुपरमार्केटमध्ये कॉलिबली या अतिरेक्याने दोघांची हत्या केली होती तर पाचजणांना ओलीस ठेवले होते. त्याच्या सुटकेची धडक कारवाई झाली तेव्हा चार ओलीस मृत्युमुखी पडल्याचे उघड झाले. त्यांची हत्या अतिरेक्यानेच केली की ते चकमकीदरम्यान पळताना प्राणास मुकले, हे उघड झालेले नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नरेंद्र मोदींची ऑलंदेंशी चर्चा
पॅरिस हल्लाप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी फ्रान्सचे अध्यक्ष फ्रॅन्क्वाइस हॉलंदे यांच्याशी चर्चा केली. या हल्लाप्रकरणी शोक व्यक्त करत दहशतवादाचे निवारण करण्यासाठी भारत फ्रान्सला सहकार्य करेल, असे आश्वासन मोदी यांनी दिले.
 दरम्यान, अमेरिकेचे संरक्षणमंत्री चक हेगल यांनी फ्रेच संरक्षणमंत्री जीन-वेज ले ड्राइन यांच्याशी चर्चा केली असून, सवरेतपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. जर्मनीचे चॅन्सलर अँजेला मर्केल यांची ऑलंदे यांच्याशी भेट होणार होती. मात्र या हल्ल्याच्या पाश्र्वभूमीवर ही भेट पुढे ढकलण्यात आली आहे.सोनियांना आव्हान
‘शार्ली एब्दो’ हल्ला  म्हणजे दहशतवादाविरोधी युद्धाची प्रतिक्रिया होती, असे वादग्रस्त विधान करून माजी केंद्रीय मंत्री मणिशंकर अय्यर यांनी स्वपक्षाच्याच नेत्यांची कोंडी केली आहे. अय्यर यांच्या विधानावर सोनिया गांधी यांनीच स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी केली आहे.

 

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Police storms two hostages sites all terror suspects killed four hostages dead in supermarket siege
First published on: 10-01-2015 at 12:15 IST