खाणकाम व प्रदूषणामुळे पश्चिम घाटातील शुद्धपाण्याच्या स्रोतांवर आधारित परिसंस्था व अनेक प्रकारच्या सजीवांच्या प्रजाती या धोक्यात आल्या आहेत, असा इशारा इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झव्‍‌र्हेशन ऑफ नेचर (आययूसीएन) या संस्थेच्या अहवालात देण्यात आला आहे. पश्चिम घाटाचा बराच भाग महाराष्ट्रात येतो.
या अहवालात म्हटले आहे की, पश्चिम महाराष्ट्र हे जैविक विविधता असलेले क्षेत्र आहे. तेथे विकास कामांचे नियोजन करताना शुद्ध पाण्याच्या स्रोतांचा व वन्य प्रजातींच्या रक्षणाचा विचार करण्यात आला नाही. त्याबाबत माहितीही घेण्यात आली नव्हती.
स्टेट्स अँड डिस्ट्रिब्यूशन ऑफ फ्रेशवॉटर बायोडायव्हर्सिटी या अहवालात म्हटले आहे की, अनेक संरक्षित ठिकाणे ही शुद्ध पाण्याच्या स्रोतांजवळ असली तरी तेथील जैवविविधता धोक्यात येत आहे. प्रदूषणामुळे ५० टक्के मासे व २० टक्के मृदुकाय प्राणी व २१ टक्के दंतपंखी सजीव धोक्यात आले आहेत व कृषी व औद्योगिक प्रदूषणामुळे अनेक प्रजाती धोक्यात आल्या आहेत. व्यावसायिक मासेमारी व अ‍ॅक्वेरियम (मत्स्यालय) व्यापारामुळे हा परिणाम झाला आहे. जैविक स्रोतांचा वापर हा मासे ३८ टक्के, मृदुकाय प्राणी १७ टक्के व दंतपंखी ७ टक्के प्रमाणात करतात.
निवासी व व्यावसायिक विकास, धरणे व ऊर्जा निर्मिती, खाणकाम यामुळे पश्चिम घाटातील शुद्ध पाण्याच्या स्रोतांमधील प्रजातींवर परिणाम झाला आहे.
आययूसीएनच्या ग्लोबल स्पेसीज प्रोग्रॅममधील शुद्धजलस्रोतातील जैवविविधता विभागाने हा अहवाल तयार केला आहे त्यात झू आउटरीच ऑर्गनायझेशनचाही समावेश आहे. त्यात परिसंस्था सुधारण्यासाठी उपाय सुचवण्यात आले आहेत. प्रदूषण प्रतिबंध कायद्यांची अंमलबजावणी, पीक पद्धतींचे योग्य व्यवस्थापन, नदी खोरे परिसरातील औद्योगिक दूषित पाण्यावर प्रक्रिया करणे, सेंद्रिय शेतीचा वापर व घन कचरा विल्हेवाटीची प्रभावी व्यवस्था असे उपाय सांगण्यात आले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पश्चिम घाट धोक्यात
जगातील सर्वाधिक जैवविविधता असलेले हे क्षेत्र सातपुडय़ापासून कन्याकुमारीपर्यंत पसरलेले आहे. त्याच्या आधारे ४० कोटी लोकांना पाणी मिळते ते पिण्यासाठी, पाटबंधाऱ्यांसाठी, जलविद्युतसाठी वापरले जाते. अनेक अन्नस्रोत तेथे आहेत व त्यामुळे त्या परिसरातील जीवन टिकून आहे, पश्चिम घाटात पर्वतीय परिसरात ५० टक्के जंगले १९०० च्या सुरुवातीपासून नष्ट झाली व नंतर तेथे अतिक्रमणे व जंगलतोड सुरूच राहिली.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pollution threatens western ghats freshwater ecosystems study
First published on: 29-12-2014 at 01:22 IST