Spain Crime News: कोविड लॉकडाऊन संपल्यानंतरही तब्बल चार वर्षे घरात कोंडलेल्या स्पेनमध्ये राहणाऱ्या तीन जर्मन मुलांची पोलिसांनी नुकतीच सुटका केली आहे. कोविड महामारीच्या शेवटच्या लाटेनंतर त्यांच्या पालकांनी ८ वर्षांची जुळी मुले आणि त्यांची १० वर्षांची मुलगी या भावंडांना चार वर्षे घरात कोंडून ठेवले होते. नुकतीच स्पेनमधील ओविएडो येथील एका घरातून त्यांची सुटका करण्यात आली आहे. ही घटना समोर आल्यानंतर त्यांच्या पालकांना अटक करण्यात आली असून, त्यांच्यावर घरगुती हिंसाचार, मानसिक शोषण आणि मुलांवर अत्याचार केल्याचे ठेवण्यात आले आहेत.
स्कायन्यूजच्या वृत्तानुसार, २०२१ पासून मुलांना घरात बंदिस्त करण्यात आले होते. या प्रकरणी आरोपी पालकांच्या घराच्या शेजारी राहणाऱ्यांनी मुलांच्या अनुपस्थितीबद्दल तक्रार दाखल केल्यानंतर स्पेनमधील पोलिसांनी याचा तपास सुरू केला होता. यानंतर पोलिसांना आढळून आले की, ऑक्टोबर २०२१ मध्ये या कुटुंबाने हे घर भाड्याने घेतले होते. घर भाड्याने घेताना त्यांनी फक्त आरोपी वडिलांचे नाव नोंदवले होते. स्थानिकांनी अधिकाऱ्यांना असेही सांगितले की, डिसेंबर २०२१ पासून त्यांनी कोणालाही घरात प्रवेश करताना किंवा बाहेर पडताना पाहिले नाही.
२८ एप्रिल रोजी जेव्हा पोलीस अधिकारी आरोपींच्या घरी गेले तेव्हा पीडित मुलांच्या आईने पोलिसांना, मुले आजारी असल्याने शांतता राखा असे सांगितले. यानंतर पोलिसांनी घराची तपासणी केल्यानंतर, त्यांना घरात कचरा आणि मोठ्या प्रमाणात औषधे आणि मास्क तसेच इतर वस्तू आढळल्या.
“आम्ही घरात गेलो तेव्हा मुले भयानक स्थितीत आढळली. ते अगदीच भयानक दृश्य होते. मुले कुपोषित नव्हती, कारण त्यांना खायला दिले जात होते. पण ते खूप अस्वच्छ होते. ते वास्तवापासून पूर्णपणे तुटलेले होते. यानंतर जेव्हा आम्ही त्यांना घराबाहेर, बागेत नेले, तेव्हा ते बाहेर यायला तयार होत नव्हते. पण, जेव्हाल त्यांना बागेत नेले तेव्हा त्यांना एक गोगलगाय दिसली यामुळे ते घाबरले,” असे एका पोलिस अधिकाऱ्याने स्कायन्यूजला सांगितले.
एका पत्रकार परिषदेत बोलताना, ओविएडोचे पोलीस प्रमुख जेवियर लोझानो यांनी या घराचे वर्णन “हाऊस ऑफ हॉरर” असे केले. “आम्ही तीन मुलांना त्यांचे जीवन परत दिले असून, हे भयानक घर उद्ध्वस्त केले आहे.”