जनता दल (धर्मनिरपेक्ष) पक्षाचा माजी खासदार प्रज्ज्वल रेवण्णा याला बंगळुरूमधील विशेष न्यायालयाने बलात्कार प्रकरणात शनिवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. प्रज्ज्वल रेवण्णा हा माजी पंतप्रधान एच डी देवेगौडा यांचा नातू, तसेच माजी मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी यांचा पुतण्या आहे. त्याच्यावर बलात्काराचे आरोप झाल्यानंतर त्याला पक्षातून निलंबित करण्यात आले आहे.
बंगळूरुमधील विशेष खासदार, आमदार न्यायालयाचे न्यायाधीश संतोष गजानन भट यांनी ३४ वर्षीय प्रज्ज्वल रेवण्णाला जन्मठेप सुनावतानाच १० लाख रुपयांचा दंडही ठोठावला. प्रज्ज्वलविरोधात लैंगिक छळ आणि बलात्काराचे चार खटले भरण्यात आले असून त्यापैकी एका खटल्यात विशेष न्यायालयाने त्याला शुक्रवारी दोषी ठरवले होते.
हसन जिल्ह्यातील होलेनारसीपुरा येथे देवेगौडा यांच्या कुटुंबीयांचे गन्नीकाडा फार्महाऊस आहे. तिथे काम करणाऱ्या एका ४८ वर्षीय महिलेने २०२१मध्ये प्रज्ज्वलने दोन वेळा बलात्कार केल्याचा, तसेच ते कृत्य मोबाइल फोनवर चित्रित केल्याची तक्रार दाखल केली होती. त्या प्रकरणी त्याला जन्मठेप आणि दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
सरकारी पक्षाने प्रज्ज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षेची द्यावी अशी विनंती केली. तर त्याने आपण कोणताही गुन्हा केलेला नाही असा युक्तिवाद केला. “आपली राजकारणात वेगाने भरभराट झाली हीच केवळ आपली चूक आहे,” असा दावा त्याने केला. आपण यांत्रिकी अभियंता असून नेहमीच चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्याचेही प्रज्ज्वलने सांगितले आणि आपल्याला कमी शिक्षा द्यावी अशी न्यायालयाला विनंती केली. पण न्यायालयाने ती मान्य केली नाही.