Premanand Maharaj Statement: गेल्या दोन दिवसांपासून आध्यात्मिक गुरू प्रेमानंद महाराज यांच्या एका टिप्पणीवर जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. प्रेमानंद महाराज यांनी एका भक्ताच्या प्रश्नावर दिलेल्या उत्तराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे. या व्हिडीओमध्ये प्रेमानंद महाराज विवाहव्यवस्था व सध्याच्या तरुणाईबद्दल टिप्पणी करताना दिसत आहेत. लग्नाआधीच नातेसंबंध ठेवणाऱ्या तरुणाईचं चारित्र्य चांगलं राहिलेलं नसल्याचं प्रेमानंद महाराज यांनी म्हटलं आहे.
काय होता प्रश्न?
व्हिडीओमध्ये प्रेमानंद महाराज यांना एका व्यक्तीने आजकाल विवाह यशस्वी ठरत नसल्याबाबत विचारणा केली. “आजकाल मुलांनी त्यांच्या पसंतीने लग्न केलं किंवा पालकांच्या पसंतीने लग्न केलं, तरी ते यशस्वी ठरत नाही, त्याचे परिणाम चांगले दिसत नाहीत”, यासंदर्भात मत व्यक्त करण्याची विनंती त्या व्यक्तीने प्रेमानंद महाराज यांना केली. त्यावर त्यांनी दिलेल्या उत्तराचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
प्रेमानंद महाराज यांच्या विधानावरून वाद का?
सध्याच्या तरुणाईचं चारित्र्य चांगलं राहिलं नसल्याचं प्रेमानंद महाराज आपल्या टिप्पणीमध्ये म्हणाले. “विवाहांचे परिणाम चांगले दिसणार कसे? आजकाल मुला-मुलींचं चारित्र्य चांगलं राहिलेलं नाही. आपल्या आई-बहिणींचं पूर्वीचं राहणीमान बघा. आमच्या गावातली गोष्ट मी सांगतोय. त्या वृद्ध जरी असल्या, तरी चेहरा डोळ्यांपर्यंत पदराने झाकलेला असायचा. पण आज मुलं-मुली कसे कपडे घालतात, कसं वागतात? एका मुलाशी ब्रेकअप, मग दुसऱ्याशी नातं, दुसऱ्याशी ब्रेकअप, मग तिसऱ्याशी नातं. हे नातं मग व्याभिचारात रुपांतरीत होतं. कसं शुद्ध असेल?” असं प्रेमानंद महाराज म्हणाले.
मुलांचीही अवस्था मुलींसारखीच – प्रेमानंद महाराज
दरम्यान, मुलींप्रमाणेच मुलांचीही परिस्थिती असल्याचं प्रेमानंद महाराज यांनी यावेळी म्हटलं. “समजा आपल्याला चार हॉटेलांमधलं जेवण जेवायची सवय लागली असेल, तर घरचं जेवण चांगलं लागणारच नाही. जर चार पुरुषांना भेटण्याची सवय लागली असेल, तर एका पतीचा स्वीकार करण्याची हिंमत त्या मुलीमध्ये राहणार नाही. त्याचप्रमाणे जर चार मुलींशी एखाद्या मुलाने व्याभिचार केला असेल, तर तो आपल्या पत्नीसोबत सुखी राहू शकत नाही. त्याला चार मुलींशी व्याभिचार करावा लागेल. कारण त्यानं अशी सवय लावून घेतली आहे”, असं ते म्हणाले.
?Swami Premanand Ji Maharaj says, “Only 2 to 4 girls out of 100 are pure in today’s times.” pic.twitter.com/xAXuwVpraC
— Megh Updates ?™ (@MeghUpdates) July 29, 2025
“…तो मुलगा चांगला पती कसा होऊ शकेल?”
“आपल्या सवयी बिघडत चालल्या आहेत. आपल्या मुलांच्या सवयी बिघडत चालल्या आहेत. हे सगळं मोबाईल वगैरे वापर वाढलाय, वाईट गोष्टी वाढत चालल्यात. आजकाल चांगली पत्नी मिळणं किंवा चांगला नवरा मिळणं फार अवघड आहे. १०० पैकी फारतर दोन-चार मुली अशा असतील ज्या पवित्र असतात आणि आपल्या पतीला आपलं जीवन समर्पित करतात. ज्यांनी लग्नाआधी चार मुलांशी नातं ठेवलं असेल, त्या चांगल्या सुना कशा होतील? तसंच ज्या मुलानं लग्नाआधी चार मुलींशी नातं ठेवलं असेल, तो चांगला पती कसा होऊ शकेल?”, असा सवाल प्रेमानंद महाराज यांनी उपस्थित केला आहे.
“पावित्र्य जपण्यासाठी भारतात महिलांनी आत्महत्याही केल्या आहेत”
“भारत धर्मप्रधान देश आहे. पण आपल्या देशात विदेशी वातावरण शिरलं आहे. इथे चुका खूप वाढल्या आहेत. लिव्ह इन काय आहे? सगळीच घाण. जेव्हा मोगलांचं आक्रमण झालं, तेव्हा पावित्र्य जपण्यासाठी महिलांनी आत्महत्या केली, पण आक्रमकांना स्पर्शही करू दिला नाही. आज हे सगळं काय चाललंय? आपल्या पतीसाठी जीव देण्याची आपल्या देशात भावना राहिली आहे. माझा जीव गेला तरी चालेल, पण माझ्या पतीला काही होता कामा नये. पण इथे पतींसोबत काय काय घडतंय. पत्नीला आपल्या संस्कृतीत प्राण मानलं गेलंय, अर्धांगिनी मानलं गेलंय. कुठे गेले आपले संस्कार? विवाहाच्या आधीपासूनच व्याभिचार होत असल्यामुळे हे होत आहे”, असंही प्रेमानंद महाराज यावेळी म्हणाले.
“आपला भारत देश आहे. हा काही विदेश नाही, आज एकासोबत, उद्या दुसऱ्यासोबत, परवा तिसऱ्यासोबत. आज सगळ्यात मोठी समस्या ही आहे की मुलं-मुलीच पवित्र नाही राहिले. काही करून तुम्हाला पवित्र जोडीदार मिळाले तर देवाचं वरदान समजा. मी म्हणतो लहानपणी काही चुका झाल्या असतील त्या असतील. पण लग्न झाल्यानंतर तरी सुधरा”, असं ते म्हणाले.