माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना गुरूवारी ‘भारत रत्न’ या देशातील सर्वोच्च नागरिक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याहस्ते प्रणव मुखर्जींना हा पुरस्कार देण्यात आला. आज संध्याकाळी राष्ट्रपती भवनात झालेल्या या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि जनसंघाचे नेते नानाजी देशमुख आणि ज्येष्ठ संगीतकार भूपेन हजारिका यांना मरणोत्तर ‘भारत रत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या पुरस्कारासाठी जानेवारी महिन्यांतच या तिघांच्या नावांची घोषणा करण्यात आली होती. भारतरत्नने आजवर ४५ जणांना सन्मानित करण्यात आले आहे. यापूर्वी २०१५ मध्ये माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि पंडित मदन मोहन मालवीय यांना मरणोत्तर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. प्रणव मुखर्जी यांच्या नावाची भारतरत्नसाठी घोषणा होताच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांच्यासह अनेक नेत्यांनी त्यांचे अभिनंदन केले होते. दरम्यान, हजारिका आणि देशमुख यांच्यासह १२ जणांना मरणोत्तर भारतरत्नने गौरविण्यात आले आहे.

हिंगोली जिल्ह्य़ातील कडोली येथे जन्मलेले नानाजी देशमुख हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीतून घडलेले ज्येष्ठ नेते होते. जनसंघाचे नेते असलेले नानाजी हे राज्यसभेचे सदस्यही होते. त्यांनी आणीबाणीत उजव्या आणि डाव्या पक्षांना समान राजकीय कार्यक्रम देण्यात आणि इंदिरा गांधींविरोधात संघटित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. जनता सरकारचा प्रयोग अपयशी ठरल्यानंतर मात्र राजकारणातून बाहेर पडून त्यांनी ग्रामीण भारत स्वयंपूर्ण व्हावा, यासाठी स्वत:ला झोकून दिले. चित्रकूट येथे त्यांनी भारतीय संस्कृती आणि शिक्षण या बाबतीत मोठे कार्य केले होते. २०१० मध्ये वयाच्या ९५ व्या वर्षी त्यांचे निधन झाले.

तसेच भूपेन हजारिका यांनी आसामात चित्रपट संगीतकार, गायक, गीतकार आणि दिग्दर्शक म्हणून विपुल कार्य केले. आसामीबरोबरच हिंदी आणि बंगाली चित्रपटांनाही त्यांनी संगीत दिले होते. चित्रपट सृष्टीतील सर्वोच्च अशा ‘दादासाहेब फाळके पुरस्कारा’ने तसेच पद्म किताबानेही त्यांचा गौरव झाला होता. ‘इप्टा’पासून कलाजीवनाचा प्रारंभ केलेले हजारिका अनेक सामाजिक आंदोलनातही सहभागी होते. २०११ साली वयाच्या ८५ व्या वर्षी त्यांचे मुंबईत निधन झाले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pranab mukherjee receives bharat ratna indias highest civilian award dmp
First published on: 08-08-2019 at 19:18 IST