Praniti Shinde Speech on Operation Sindoor At Lok Sabha Session : पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी केलेला हल्ला आणि त्यानंतर भारतीय सैन्यदलाने राबवलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ या मोहिमेबाबत लोकसभेमध्ये प्रदीर्घ चर्चा चालू आहे. या चर्चेदरम्यान, विरोधकांनी अनेक प्रश्न उपस्थित करून सरकारला धारेवर धरलं. दरम्यान, काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे त्यांच्यावर टीका होऊ आहे. प्रणिती शिंदे सभागृहात म्हणाल्या की “ऑपरेशन सिंदूर हे नाव जरी देशभक्तीचं वाटत असलं तरी हा केवळ सरकारचा प्रसारमाध्यमांवरील तमाशा होता. या मोहिमेतून सरकारने काय सिद्ध केलं ते अद्याप कोणालाही समजलेलं नाही.”
खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या, “ऑपरेशन सिंदूर हे नाव ऐकताना असं वाटतं की यात देशभक्ती आहे. मात्र, हा प्रसारमाध्यमांवर दाखवला गेलेला सरकारचा एक तमाशा होता. कारण या मोहिमेद्वारे आपण काय साध्य केलं, किती दहशतवाद्यांना पकडलं, शत्रूने आपली किती विमानं पाडली या हल्ल्याला कोण जबाबदारी होतं, यात कोणाची चूक होती, दहशतवादी कुठून आले, आपल्या नागरिकांना ठार मारून दहशतवादी कुठे पळून गेले, यापैकी सरकारला काहीच माहिती नाही. सरकारकडे कुठल्याही प्रश्नाचं उत्तर नाही.”
“पंतप्रधान २४/७ निवडणुकांच्या विचारात असतात”
काँग्रेसच्या खासदार म्हणाल्या, “सरकारकडे ऑपरेशन सिंदूरबाबत कुठल्याही प्रश्नाचं उत्तर नाही आणि यांना शेजारी असलेल्या देशावर आक्रमण करायचंय, त्या नावाखाली निवडणुकीत लोकांची मतं घ्यायची आहेत. कोणी मेलं तरी यांना काहीच फरक पडत नही. कारण आपले पंतप्रधान आणि सरकार २४/७ (दिवसाचे २४ तास, आठवड्याचे सातही दिवस) निवडणुकांच्या मोडमध्ये असतात. आपल्या देशाची प्रतिमा याआधी इतकी कमकुवत कधीच झाली नव्हती. मात्र, या लोकांमुळे तसं घडलंय. कारण यांना प्रत्येक गोष्टीचा इव्हेंट करायचा आहे. माझी मोदींना विनंती आहे की प्रत्येक गोष्टीचा इव्हेंट करणं थांबवा. माझी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती आहे की त्यांनी त्यांची ‘मन की बात’ थांबवून ‘जन की बात’ करावी, जनतेच्या प्रश्नांची उत्तरं देण्याची हिंमत दाखवावी.”