पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्याची नुकतीच सांगता झाली. या दौऱ्यामध्ये मोदींच्या भेटीगाठींपासून ते त्यांच्या अमेरिकन सिनेटर्ससमोरील भाषणापर्यंत सर्वच गोष्टींची सध्या जोरदार चर्चा चालू आहे. या दौऱ्यामधून भारत व अमेरिका यांच्यातील द्विपक्षीय संबंध अधिक घट्ट होतील, एकत्रित विकासासाठी प्रयत्न होतील, दहशतवादाविरोधातील लढा सक्षम होईल अशा अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अमेरिकन सिनेटर्ससमोरील भाषणाची चर्चा असताना दुसरीकडे याच भाषणातील काही क्लिप्सचा एक व्हिडीओ सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी शेअर केला आहे.
काय आहे या व्हिडीओमध्ये?
प्रशांत भूषण यांनी आपल्या ट्वीटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींना खोचक टोला लगावला आहे. त्यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये मोदींनी अमेरिकन सिनेटर्ससमोर केलेल्या भाषणातील काही क्लिप्स एकत्र करण्यात आल्या आहेत. यामध्ये मोदींनी काही शब्दांचा चुकीचा उच्चार केल्याचा दावा करण्यात आला आहे. यामध्ये ‘इन्व्हेस्ट’चा ‘इन्व्हेस्टिगेट’, ‘ऑप्टिकल फायबर’चा ‘पोलिटिकल फायबर’ किंवा ‘रिलेशनशिप’चा ‘रिलेशनसिपी’ असा उच्चार करण्यात आल्याचं ऐकू येत आहे.
अग्रलेख : आषाढातील अमेरिकावारी!
“विश्वगुरू असालही, पण इंग्रजीपासून लांब राहा”
दरम्यान, या व्हिडीओच्या सत्यासत्यतेबाबत प्रशांत भूषण यांनी ट्वीटमध्ये कोणताही उल्लेख केलेला नाही. “त्यांनी हिंदीपर्यंतच मर्यादित राहावं. तुम्ही विश्वगुरू असालही, पण तरीही तुमचं इंग्रजी दाखवण्यापासून लांब राहा. एंटायर पॉलिटिकल सायन्स या विषयात एमए पूर्ण केलेल्या व्यक्तीला टेलिप्रॉम्प्टरवरूनही इंग्रजी वाचण्यात अडचण यावी!” असं खोचक ट्वीट प्रशांत भूषण यांनी केलं आहे.
प्रशांत भूषण यांच्या या ट्वीटखाली नेटिझन्सनीही या व्हिडीओवर प्रतिक्रिया देताना त्यावर नाराजी व्यक्त केली आहे. तसेच, काहींनी प्रशांत भूषण यांनाच त्यांच्या भाषेवरून ट्रोल करायला सुरुवात केली.