scorecardresearch

प्रशांत किशोर यांचा राहुल गांधींना फोन; गुजरात निवडणुकीत काँग्रेससाठी रणनीती आखणार असल्याच्या चर्चेला उधाण!

आगामी गुजरात निवडणुकांसाठी प्रशांत किशोर काँग्रेससाठी रणनीती करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

prashant kishor stratagy for gujrat election congress
प्रशांत किशोर गुजरात निवडणुकांमध्ये काँग्रेससाठी रणनीती करणार असल्याचं सांगितलं जात आहे.

गेल्या वर्षी निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू होती. खुद्द प्रशांत किशोर आणि काँग्रेसकडून सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी यांच्या विधानांमुळे त्यात अजूनच भर पडत होती. मात्र, ऐववेळी कुठेतरी माशी शिंकली आणि खात्रीशीर वाटणारा प्रवेश रद्द झाला. त्यानंतर प्रशांत किशोर यांनी ममता बॅनर्जींसाठी निवडणुकीचं नियोजन केलं आणि काँग्रेसनं प्रशांत किशोर यांच्याच एका सहकाऱ्यासोबत चर्चा सुरू केली. पण आता पुन्हा एकदा प्रशांत किशोर काँग्रेससाठी रणनीती करणार असल्याचं बोललं जात आहे. खुद्द प्रशांत किशोर यांनीच राहुल गांधींशी याबाबत सविस्तर चर्चा केल्याचं सांगितलं जात आहे.

डिसेंबर महिन्यात गुजरातमध्ये निवडणुका

या वर्षी डिसेंबर महिन्यात गुजरातमध्ये १८२ जागांसाठी विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाचा मोठा पराभव झाला आहे. पंजाबमध्ये काँग्रेसच्या हातची सत्ता देखील गेली आहे. या पार्श्वभूमीवर पक्षात चलबिचल सुरू झाली असून आगामी निवडणुकांसाठी पूर्ण तयारीनिशी उतरण्याची भूमिका नेतेमंडळींकडून मांडली जात आहे.

प्रशांत किशोर यांचा राहुल गांधींना फोन

दरम्यान, गुजरातमधील निवडणुकांमध्ये भाजपाला कडवी टक्कर देण्यासाठी काँग्रेसनं आत्तापासूनच तयारी सुरू केली आहे. त्यातच आता निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी स्वत: राहुल गांधींशी चर्चा करून गुजरात निवडणुकांसाठी काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मात्र, प्रशांत किशोर नेमके किती काळासाठी पक्षासोबत राहतील, याविषयी अद्याप नेमकी माहिती मिळू शकलेली नाही.

Election Results: ‘हा २०२४ चा कौल’ म्हणणाऱ्या मोदींना प्रशांत किशोर यांचा टोला; म्हणाले “साहेबांना हे ठाऊक…”

अंतिम निर्णय काँग्रेस हायकमांड घेणार

प्रशांत किशोर यांनी फक्त गुजरात निवडणुकांपुरतंच काँग्रेससाठी काम करणार असल्याचा प्रस्ताव राहुल गांधींशी बोलताना ठेवल्याचं सांगितलं जात आहे. यासंदर्भात अंतिम निर्णय काँग्रेस हायकमांडकडून घेतला जाणार आहे. गुजरात निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या काँग्रेसच्या बैठकीमध्ये यावर चर्चा केली जाणार असल्याची माहिती मिळत आहे.

गेल्या वर्षी काँग्रेससोबत बोलणी फिसकटल्यानंतर प्रशांत किशोर यांनी पक्षावर टीका केली होती. “पक्षाचं अध्यक्षपद भूषवण्याचा अधिकार कुण्या एका व्यक्तीचा असू शकत नाही. विशेषत: गेल्या १० वर्षांत पक्षानं लढवलेल्या निवडणुकांपैकी ९० टक्के निवडणकांमध्ये पराभव पत्करावा लागला असताना”, अशी टीका प्रशांत किशोर यांनी केली होती.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Prashant kishor to work with congress for gujrat elections 2022 pmw

ताज्या बातम्या