निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर यांनी आपण कोणताही पक्ष काढणार नसल्याचे सांगत चर्चांना पूर्णविराम दिला आहे. मात्र, भविष्यात कोणताही पक्ष स्थापन झाला तर तो सर्वांचाच असेल, असं सांगण्यासही विसरले नाही. बिहारच्या भल्यासाठी काम करणार असल्याचंही प्रशांत किशोर यांनी सांगितलं. बिहारची राजधानी पाटणा येथे पत्रकार परिषदेला संबोधित करत त्यांनी आपली बाजू मांडली. “येत्या तीन ते चार महिन्यांत १८ हजार लोकांशी संवाद साधणार असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यांचे विचार जाणून चर्चा करेल. जर ते सहमत असतील तर त्यांना भागीदार बनवेल. पक्ष स्थापन केला तर प्रशांत किशोर यांचाच नाही तर सर्वांचा पक्ष असेल.”

“बिहारमधील लोकांपर्यंत पोहोचणे. लोकांच्या समस्या समजून घेऊन पुढील अपेक्षा समजून घेण्याचा प्रयत्न करेन. यासाठी २ ऑक्टोबरपासून मी पश्चिम चंपारणपासून तीन हजार किमीची पदयात्रा करणार आहे. जन स्वराज संकल्पनेशी जोडण्याचा प्रयत्न करणार आहे.”, असंही प्रशांत किशोर यांनी सांगितलं. “मी बिहारला आश्वासन देतो की माझ्याकडे जे काही आहे ते मी बिहारच्या भल्यासाठी समर्पित करत आहे. या काळात कोणालाही मध्येच सोडण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.”, असंही त्यांनी पुढे सांगितलं. यावेळी प्रशांत किशोर यांनी बिहारच्या आधीच्या सरकारांवर हल्लाबोल करत म्हटले की, “लालू आणि नितीश यांच्या ३० वर्षांच्या राजवटीतही बिहार हे देशातील सर्वात मागासलेले आणि गरीब राज्य आहे. विकासाच्या अनेक मापदंडांमध्ये बिहार अजूनही देशातील सर्वात खालच्या क्रमांकावर आहे. बिहारला आगामी काळात आघाडीच्या राज्यांच्या यादीत यायचे असेल, तर त्यासाठी नवा विचार आणि नव्या प्रयत्नांची गरज आहे.”

प्रशांत किशोर यांची देशभरात निवडणूक रणनीतीकार म्हणून ख्याती आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या विजयात त्यांचा मोलाचा वाटा होता. त्यानंतर त्यांनी २०१७ साली पंजाबमध्ये काँग्रेस, बिहारमध्ये जेडीयू आणि पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेससाठी निवडणूक रणनिती आखली होती. त्यात त्यांना अपेक्षित यश देखील मिळालं.