गर्भातील बाळावर संस्कार करण्यासाठी डॉक्टरांनी गर्भवती महिलांनी प्रभू राम, हनुमान, शिवाजी महाराज आणि स्वातंत्र्यसैनिकांविषयीची पुस्तकं वाचण्यासाठी प्रोत्साहित करावे, असा सल्ला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असलेल्या संवर्धिनी न्यास या संघटनेने दिला आहे. या संघटनेकडून ‘गर्भ संस्कार’ मोहीम सुरू करण्यात आली असून यसंदर्भात रविवारी जेएनयूमध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
हेही वाचा – “ब्रिटीश भारतात येण्यापूर्वी ७० टक्के लोकसंख्या…”, सरसंघचालक मोहन भागवत यांचं विधान
टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, संवर्धिनी न्यास या संघटनेकडून ‘गर्भ संस्कार’ मोहीम सुरू करण्यात आली आहे. या अंतर्गत स्त्रीरोग तज्ञांना गर्भवती महिलांशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जन्मापूर्वीच बाळाला भारतीय संस्कृतीची ओळख कशी करून द्यावी, याबाबत डॉक्टरांनी महिलांना मार्गदर्शन करावे, असं या संघटनेकडून सांगण्यात आलं आहे.
हेही वाचा – “बापट आणि टिळकांना डावलून काही निर्णय घेतले, तर…”, शरद पवारांचं वक्तव्य
यासंदर्भात बोलताना, संवर्धिनी न्यासच्या राष्ट्रीय सचिव माधुरी मराठे म्हणाल्या, ”महिलांनी गर्भातूनच बाळावर संस्कार करावे. त्यांना भारतीय मूल्यांची ओळख करून द्यावी. त्यासाठी याकाळात महिलांनी प्रभू राम, हनुमान, शिवाजी महाराज आणि स्वातंत्र्यसैनिकांविषयीची पुस्तकं वाचावीत” दरम्यान, जवाहरलाल नेहरू विद्यापीठात या कार्यक्रमाला विविध राज्यातील ७० ते ८० स्त्रीरोग तज्ञ उपस्थित होते.