आपला देश आर्थिक संकटात असताना तुम्ही १९९१ मध्ये ज्या आर्थिक सुधारणांचा मार्ग अनुसरलात तो नक्कीच लक्षात ठेवील, १९९० च्या सुमारास भारताने वाढीच्या दरात मोठी कामगिरी केल्यानंतर विकासाचा एक नवीन टप्पा सुरू झाला, हे विसरता येणार नाही अशा भावपूर्ण शब्दांत राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना भावपूर्ण निरोप दिला. यावेळी पंधराव्या लोकसभेतील विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
राष्ट्रपती मुखर्जी यांनी डॉ. मनमोहन सिंग यांच्याबरोबर चाळीस वर्षे काम केल्याचे सांगितले. त्यांच्या नोकरशाहीतील प्रवेशापासून ते पंतप्रधानपदापर्यंतची वाटचाल आपण जवळून अनुभवली. त्यामुळे खरे तर अशा प्रसंगी बोलण्याचा प्रघात नाही पण मला बोलण्याचा मोह आवरत नाही असे सांगून मुखर्जी म्हणाले की, नेहमीची प्रथा मोडून आपण ज्यांच्याबरोबर ४० वर्षे काम केले त्या सभ्यगृहस्थाविषयी आपण बोलणार आहोत.
डॉ. सिंग यांना आपण कनिष्ठ अर्थमंत्री असताना १९७४ मध्ये भेटलो त्यांचे अर्थशास्त्रातले ज्ञान सखोल असल्याचे तेव्हाच आपल्याला दिसून आले होते. डॉ. सिंग यांची रिझर्व बँकेच्या गव्हर्नरपदी नेमणूक करण्याच्या आदेशावर आपणच स्वाक्षरी केली होती, गव्हर्नर म्हणून त्यांनी रिझर्व बँकेच्या कामावर ठसा उमटवला, त्यांनी वेळोवेळी जबाबदाऱ्या पार पाडताना आपल्याला मोलाचे सल्ले दिले त्याबद्दल आपण ऋणी आहोत.
त्यानंतर डॉ. मनमोहन सिंग यांनीही आपण या क्षणी भावुक झालो तर समजून घ्या असे सांगून मुखर्जी यांच्याबरोबरच्या कारकिर्दीचे स्मरण केले. आपण मुखर्जी यांच्या बरोबर नियोजन आयोगाचे सदस्य व रिझर्व बँकेचे गव्हर्नर म्हणून काम केले. यूपीएमध्ये ते आमचे मोलाचे सहकारी होते, अनुभवी व ज्येष्ठ मंत्री होते, अत्यंत अवघड जबाबदाऱ्या त्यांच्या खांद्यावर आम्ही टाकत होतो. आर्थिक सुधारणा राबवल्या तेव्हा मुखर्जी यांचा अनुभव व पाठिंबा अनमोल होता. राष्ट्रपतींची बुद्धिमत्ता, अनुभव व ज्ञान हा आपल्या देशाचा मोठा ठेवा आहे, असे आपल्याला वाटते.
मावळत्या मंत्रिमंडळातील सदस्यांना मुखर्जी यांनी सोरसी पटुरी ही माशाची डिश खास मेजवानी म्हणून  दिली. पंजाबी कढी पकोडाही ठेवण्यात आला होता. गलोटी कबाब ही राष्ट्रपतींची आवडती डिश, मुर्ग निहारी, पोटोल डोरमा (भरलेला भोपळा) अंजीर के कोफ्ते, पनीर पसंद या खाद्यपदार्थाचाही यावेळी समावेश होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: President pranab mukherjee gives farewell to manmohan singh
First published on: 19-05-2014 at 06:12 IST