दिवसेंदिवस उच्च शिक्षण घेणे आव्हानात्मक होत चालले आहे असे म्हणत उच्च शिक्षणाला नवसंजीवनी देणारे पोषक वातावरणच उपलब्ध नसल्याची खंत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी आज व्यक्त केली. भारतात तसेच जगभरात उच्च शिक्षणाची स्थिती खालावत चालली आहे असे ते म्हणाले. एखाद्या विषयाचा ध्यास घेणे किंवा ज्ञानार्थी बनणे हाच शिक्षणाचा खरा उद्देश आहे. ही शिकवण देण्यास आज कालची महाविद्यालये कमी पडत असल्याचे राष्ट्रपतींनी म्हटले. आशिया खंडाला ज्ञानार्जनाची थोर परंपरा लाभली आहे असे ते म्हणाले. गौतम बुद्धांनी ज्ञानाची बीजे भारतामध्ये रोवली. ही याच भूमीत अंकुरित झाली आणि समृद्ध झाली. याच भूमीत नालंदा, तक्षशिला या विद्यापीठांची स्थापना झाली आणि त्यांनी अनेक पिढ्यांना शिक्षणासाठी प्रेरित केले असे ते म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हैदराबाद येथील इंग्रजी आणि परकीय भाषा विद्यापीठाच्या पहिल्या पदवीदान प्रसंगी ते बोलत होते. उच्च शिक्षणाचा वाढता खर्च, नोकरी मिळण्याचे उद्दिष्ट ठेऊन अभ्यासक्रमाची निवड करणे या गोष्टींमुळे उच्च शिक्षणाची अवस्था बिकट झाल्याचे राष्ट्रपतींनी म्हटले.  आपल्या देशातील उच्च शिक्षणाची स्थिती सुधारवयाची असेल तर सर्वात आधी आपण आपली विचार करण्याची पद्धत बदलणे आवश्यक आहे असे ते म्हणाले. उच्च शिक्षणाची व्यवस्था बदलल्याशिवाय हे घडणार नाही असे ते म्हणाले. महाविद्यालये आणि विद्यापीठांनी आपली व्यवस्था बदलण्यावर लक्ष केंद्रित करावे असे राष्ट्रपतींनी म्हटले. व्यवस्थेत बदल घडवून आणायचा आहे असा विश्वास प्रशासकांना हवा तरच हे शक्य आहे असे ते म्हणाले. विद्यार्थ्यांना ज्ञानाची गोडी लागेल असे वातावरण निर्माण करा असे आवाहन राष्ट्रपतींनी केले आहे.