पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गोष्टी पटकन शिकतात असे म्हणत राष्ट्रपती प्रणव मुखर्जींनी मोदींवर कौतुकाचा वर्षाव केला. अर्थशास्त्र असो वा परराष्ट्र संबंध प्रत्येक विषयावर पंतप्रधान मोदींची मजबूत पकड आहे असे ते म्हणाले. एखादी गोष्ट समजून घेऊन ती गोष्ट ते तत्काळ आत्मसात करू शकतात असे राष्ट्रपतींनी म्हटले, ते इंडिया टुडे कॉन्क्लेवमध्ये बोलत होते.  सत्तेमध्ये येण्यासाठी बहुमत असणे आवश्यक असते परंतु सत्ता चालवण्यासाठी मात्र सार्वमत होणे आवश्यक असते असे ते म्हणाले. पंतप्रधान मोदींनी सर्वांच्या मनात स्थान निर्माण केल्यामुळे ते उत्तम प्रशासन करत आहे असे ते म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सातत्याने संसदेत होणाऱ्या गोंधळाबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली. गेल्या काही दिवसांपासून सतत संसदेतील सत्रांमध्ये खंड पडत आहे असे ते म्हणाले. ही बाब लोकशाहीच्या दृष्टीने अयोग्य असल्याचे ते म्हणाले. संसदेमधील सत्रांमध्ये व्यत्यय आल्यामुळे जनतेचेच नुकसान होते तेव्हा आपण सर्व लोकप्रतिनिधींना कळकळीची विनंती करत आहोत की तुम्ही मार्गदर्शक तत्वांचे पालन करुन कामकाज गांभीर्याने करा. बहुमतामधील लोकांनी नेहमी सर्वांचा विचार करणे आवश्यक आहे असे देखील ते म्हणाले.

पंतप्रधान मोदींनी सर्वांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. त्या पूर्ण झाल्या नाहीत तर काय? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. ही चांगली बाब आहे की जनतेला अपेक्षा, आशा आणि आकांक्षा आहेत. जर त्या नसत्या तर ते त्यांच्या हक्कांबाबत जागृत नाहीत असा अर्थ निघाला असता. तेव्हा त्यांनी अपेक्षा ठेवणे योग्यच आहे असे ते म्हणाले.  हे सरकार धाडसी पावले उचलणारे सरकार आहे. कुठलाही धोका न पत्करणे हाच सर्वात मोठा धोका आहे. पंतप्रधान मोदी हे धोके पत्करतात त्यामुळे मला त्यांच्यावर पूर्ण विश्वास असून मी त्यांच्याबाबत सकारात्मक आहे असे राष्ट्रपतींनी म्हटले. राष्ट्रपती प्रणव मुखर्जींनी देशातील राजकीय परिस्थितीवर वेळोवेळी भाष्य केले आहे. असहिष्णुतेचा मुद्दा असो वा नोटाबंदी त्यावर त्यांनी आपले विचार स्पष्टपणे मांडले आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: President pranab mukherjee prime minister narendra modi
First published on: 17-03-2017 at 19:16 IST