पत्नी आणि मुलीचा खून केल्यामुळे मृत्युदंडाच्या शिक्षेस पात्र ठरलेल्या साईबन्ना निंगप्पा नाटीकर या आरोपीचा दयेचा अर्ज राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी फेटाळून लावल्याचे सूत्रांनी म्हटले आहे. पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर मृत्युदंडाच्या शिक्षेस पात्र ठरलेल्या आरोपीचा दयेचा अर्ज फेटाळण्याची मुखर्जी यांची ही दुसरी वेळ आहे.
मुखर्जी यांनी नोव्हेंबर, २०१२ मध्ये मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात फाशीची शिक्षा ठोठावण्यात आलेल्या आरोपी अजमल कसाब याचा दयेचा अर्ज फेटाळला होता. त्यानंतर त्याला पुण्यातील येरवडा कारागृहात फासावरही लटकवण्यात आले.
राष्ट्रपती भवनातून प्रसृत करण्यात आलेल्या पत्रकात सध्या कर्नाटकातील बेळगाव येथील केंद्रीय कारागृहात असलेल्या नाटीकर याचा दयेचा अर्ज मुखर्जी यांनी ४ जानेवारी रोजी फेटाळल्याचे म्हटले आहे. मुखर्जी यांनी आतापर्यंत एकूण नऊ जणांचे दयेचे अर्ज पुनर्विचारार्थ केंद्रीय गृहमंत्रालयाकडे पाठवले आहेत. २००१ मध्ये संसदेवर हल्ला करून नऊ जणांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या अफजल गुरू याच्या अर्जाचाही यात समावेश आहे.
घटनेतील अनुच्छेद ७२ नुसार कुठल्याही आरोपीला क्षमा करणे, शिक्षा कमी करणे, प्रलंबित वा निलंबित करणे, माफी वा सूट देण्याचा अधिकार राष्ट्रपतींना आहे. गृहमंत्रालय यात केवळ मध्यस्थाची भूमिका करीत असते. गेल्या नोव्हेंबरमध्ये सावत्र आई, सावत्र बहीण व सावत्र भावाची हत्या करणाऱ्या अतबीरची मृत्युदंडाची शिक्षा कमी करून राष्ट्रपतींनी त्याला जन्मठेप दिली होती. मालमत्तेच्या वादातून अतबीरने १९९६ मध्ये या तिघांची हत्या केली होती. त्याला २००४ मध्ये सत्र न्यायालयाने मृत्युदंडाची शिक्षा ठोठावली होती. हा निर्णय त्यानंतर ऑगस्ट २०१० मध्ये उच्च व सर्वोच्च न्यायालयाने उचलून धरला होता. १५ नोव्हेंबर रोजी राष्ट्रपतींनी आपल्या अधिकारात त्याची शिक्षा मृत्युदंडावरून जन्मठेपेत परावर्तित केली होती.
संग्रहित लेख, दिनांक 15th Jan 2013 रोजी प्रकाशित
राष्ट्रपतींनी दयेचा अर्ज फेटाळला
पत्नी आणि मुलीचा खून केल्यामुळे मृत्युदंडाच्या शिक्षेस पात्र ठरलेल्या साईबन्ना निंगप्पा नाटीकर या आरोपीचा दयेचा अर्ज राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी फेटाळून लावल्याचे सूत्रांनी म्हटले आहे. पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर मृत्युदंडाच्या शिक्षेस पात्र ठरलेल्या आरोपीचा दयेचा अर्ज फेटाळण्याची मुखर्जी यांची ही दुसरी वेळ आहे.
First published on: 15-01-2013 at 02:13 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prez rejects mercy plea of death row convict