उत्तर प्रदेशमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी केली आहे. सत्ताधारी भाजपाला घेरण्यासाठी विरोधी पक्षांनी कंबर कसली आहे. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी पंतप्रधान मोदींसह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर निशाणा साधला आहे.

”संसदेत भाजपा सरकारच्या मंत्र्याने सांगितले की, देशात सर्वाधिक कुपोषित मुलं(जवळपास ४ लाख) उत्तर प्रदेशमध्ये आहे. पंतप्रधान व मुख्यमंत्री स्वतःच स्वतःला नंबर वन म्हणत आले आहेत आणि “डबल इंजन”ची फसवाफसवी करून कुपोषणात उत्तर प्रदेशला नंबर वन बनले.” अशा शब्दांमध्ये प्रियांका गांधींनी ट्विटद्वारे टीका केली आहे.

“मोदींनी कौतुक केलं म्हणून योगी सरकारचं अपयश लपत नाही”

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्टिफिकेट दिलं म्हणून योगी सरकारचं करोना परिस्थिती हाताळण्यातलं अपयश लपत नाही अशा शब्दातही प्रियांका गांधी यांनी टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपला मतदारसंघ असलेल्या वाराणसीला भेट दिली तेव्हा करोना परिस्थिती उत्तमपणे हाताळल्याबद्दल योगी सरकारचं कौतुकह केलं होतं. यावरुन आपल्या ट्विटमधून प्रियांका गांधी यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

UP Poll: राष्ट्रवादी समाजवादी पार्टीची युती, शरद पवार-अखिलेश यादव यांचं ठरलं

तर, भाजपाला सत्तेपासून रोखण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने देखील देशपातळीवर प्रयत्न सुरु केले आहेत. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस समाजवादी पक्षाबरोबर मैदानात उतरणार आहे. उत्तर प्रदेशच्या २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस समाजवादी पक्षाबरोबर युती करेल. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सरचिटणीस केके शर्मा आणि प्रदेशाध्यक्ष उमाशंकर यादव यांनी मंगळवारी लखनऊ येथे पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे.