PM Modi China Visit : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेक देशांवर टॅरिफ लादलं आहे. ट्रम्प यांच्या या निर्णयामुळे अनेक देशांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. भारतावरही अमेरिकेकडून लावण्यात येणारे एकूण आयातशुल्क ५० टक्के झालं आहे. ट्रम्प यांनी लादलेल्या टॅरिफमुळे (आयात शुल्क) भारताला अमेरिकेत वस्तू निर्यात करण्यासाठी ५० टक्के आयात शुल्क भरावा लागत आहे. टॅरिफच्या मुद्यावरून भारत आणि अमेरिकेमधील संबंधांमध्ये काहीसा तणाव निर्माण झाला आहे.

टॅरिफच्या मुद्यावरून भारत आणि अमेरिकेमधील संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला असतानाच दुसरीकडे चीन-आणि भारतामधील संबंधांमध्ये सुधारणा होत असल्याचं पाहायला मिळत आहे. तब्बल ७ वर्षांनंतर पंतप्रधान मोदी चीनच्या तिआंजिनमध्ये दाखल झाले आहेत. शांघाय सहकार्य संघटनेची ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर रोजी चीनमधील तिआंजिनमध्ये बैठक होणार असून या बैठकीत पंतप्रधान मोदी सहभागी होणार आहेत. या संदर्भातील वृत्त हिंदुस्तान टाईम्सने दिलं आहे.

शांघाय सहकार्य संघटनेची (Shanghai Cooperation Organisation) आतापर्यंतची ही सर्वांत मोठी बैठक असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन हे देखील उपस्थित असणार आहेत. त्यामुळे या बैठकीकडे अवघ्या जगाचं लक्ष लागलेलं आहे. ट्रम्प यांनी भारतावर लादलेल्या अतिरिक्त टॅरिफ दरम्यान भारतासाठी पंतप्रधान मोदींचा हा चीन दौरा महत्वाचा ठरण्याची शक्यता आहे. या दौऱ्यात पंतप्रधान मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग व रशियाचे अध्यक्ष पुतिन यांच्यात बैठक होण्याची शक्यता आहे. या बैठकीत अनेक महत्वाचे मोठे निर्णय होण्याची शक्यता आहे.

मोदी, पुतिन, जिनपिंग, शरीफ एकाच मंचावर येणार?

शांघाय सहकार्य संघटनेची बैठक ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर रोजी चीनमधील तिआंजिन येथे होणार असून, या संघटनेची आतापर्यंतची ही सर्वांत मोठी बैठक आहे. पंतप्रधान मोदी यांच्यासह रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन हे देखील या बैठकीला उपस्थित असतील. तुर्कीचे अध्यक्ष रिसेप तय्यीप अर्दोगन, इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रबोवो सुबिआंतो, मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम, व्हिएतनामचे पंतप्रधान फाम मिन चिन्ह, पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ, नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली, मालदीवचे अध्यक्ष महंमद मुईझ्झू यांच्यासह इतर महत्त्वाचे नेते बैठकीला उपस्थित राहतील.

शांघाय सहकार्य संघटनेत रशिया, भारत, इराण, कझाकस्तान, किरगिस्तान, पाकिस्तान, ताजिकिस्तान, उझबेकिस्तान, बेलारूस, चीन या देशांचा समावेश आहे. संघटनेच्या बैठकीला उपस्थित असणारे अनेक नेते ३ सप्टेंबर रोजी होणाऱ्या विजय दिनानिमित्त संचलानाही उपस्थित राहणार आहेत.