पीटीआय, पाटणा
बिहारमध्ये काँग्रेसने नुकत्याच संपवलेल्या ‘मतदार अधिकार यात्रे’दरम्यान माझ्या आईबाबत अपशब्द वापरण्यात आल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. या प्रकाराबाबत मी राजद-काँग्रेसला माफ करू शकतो, पण बिहारचे लोक माझ्या आईचा अपमान केल्याबद्दल त्यांना माफ करणार नाहीत, असे प्रतिपादन पंतप्रधानांनी केले.
बिहारमधील बचत गटांशी संबंधित महिलांसाठी एका नवीन सहकारी संस्थेचे दृक्-दृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन करताना पंतप्रधान दिल्लीत एका सभेला संबोधित करत होते.
दरभंगा येथे अलीकडेच झालेल्या यात्रेदरम्यान एका व्यक्तीने मंचावर येऊन पंतप्रधानांबाबत अपशब्द काढल्याने त्यावर पहिल्यांदाच मोदींनी प्रतिक्रिया देत विरोधी पक्षांवर टीका केली. ‘‘भारतमातेचा अपमान करणाऱ्यांना माझ्या आईबाबत अपशब्द वापरणे गैर वाटले नसेल. मात्र त्यांना शिक्षा झाली पाहिजे. माझ्या दिवंगत आईचा राजकारणाशी काहीही संबंध नव्हता. ही शिवीगाळ केवळ माझ्या आईचाच नव्हे, तर देशातील माता-भगिनींचा अपमान करणारी आहे. बिहार तर माँ जानकीची भूमी आहे. तिने नेहमीच महिलांना आदर दिला आहे. राज्यातील जनता कधीही राजद व काँग्रेसला माफ करणार नाही,’’ असे मोदी म्हणाले.