भाजपाचे खासदार गिरीश बापट यांचं पुण्यात निधन झालं. ते गेल्या काही दिवसांपासून आजारीच होते. गिरीश बापट हे राजकारणातले अजातशत्रू म्हणून ओळखले जात होते. त्यानी महाराष्ट्रात भाजपाचे वर्चस्व वाढवण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. तसंच महाराष्ट्रात त्यांचे सगळ्याच पक्षांशी खूप चांगले संबंध होते. सगळ्याच पक्षांमधून गिरीश बापट यांच्या निधनानंतर दुःख आणि शोक व्यक्त होतो आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही गिरीश बापट यांच्या निधनाविषयी ट्वीट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. काय म्हटलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी? "गिरीश बापट यांनी महाराष्ट्र भाजपाच्या उभारणीत आणि त्यानंतर पक्ष बळकट करण्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली. लोक कल्याणाचे प्रश्न मांडणारे ते प्रभावी नेते होते. आमदार म्हणून त्यांनी जनतेचे प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम केलं. तसंच खासदार म्हणूनही त्यांची कारकीर्द खूपच चांगली होती. आपल्या कार्याचा वेगळा ठसा त्यांनी उमटवला. त्यांचे कार्य अनेकांना प्रेरणा देणारं ठरणार आहे याबाबत माझ्या मनात शंका नाही. " गिरीश बापट यांनी तळमळीने समाजाची सेवा केली "गिरीश बापट हे अत्यंत नम्र स्वभावाचे आणि कष्टाळू नेते होते. त्यांनी समाजाची सेवा अत्यंत तळमळीने आणि आपलेपणाच्या भावनेतून केली. महाराष्ट्राच्या विकासासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणावर काम केलं. पुण्याच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्न केले. त्यांचं निधन ही अत्यंत दुःखद घटना आहे. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी आहे. माझ्या सहवेदना कायमच त्यांच्यासोबत आहेत. ओम शांती! असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करून आपल्या भावना या प्रकारे व्यक्त केल्या आहेत. भाजपाचे पुण्यातील खासदार गिरीश बापट यांचं निधन झालं आहे. ते ७२ वर्षांचे होते. प्रकृती अस्वास्थ्यामुळे गेल्या दीड वर्षांपासून त्यांच्यावर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, त्यांची प्राणज्योत मालवल्याची माहिती समोर आली आहे. गिरीश बापट यांच्यावर संध्याकाळी सात वाजता वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहे, अशी माहिती जगदीश मुळीक यांनी दिली आहे. गिरीश बापट यांच्यामागे पत्नी, मुलगा, सून आणि नात असा परिवार आहे.