नवी दिल्ली : इस्रायल-हमास संघर्षांत हजारो नागरिकांचा बळी गेल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला. तसेच या संघर्षांमुळे पश्चिम आशियात नवी आव्हाने उभी राहिली असून ‘ग्लोबल साउथ’ देशांनी जागतिक हितासाठी आता एकमुखी आवाज उठवण्याची वेळ आल्याचेही पंतप्रधानांनी नमूद केले.

दूरस्थ दृक्-श्राव्य पद्धतीने झालेल्या ‘व्हॉइस ऑफ ग्लोबल साउथ’ परिषदेत बोलताना पंतप्रधान मोदी यांनी हमास-इस्रायलमधील संघर्षांमुळे आशियात उद्भवलेल्या परिस्थितीवर भाष्य केले. पश्चिम आशियातील घटनांमुळे उद्भवत असलेली नवी आव्हाने आपण पाहतच आहोत. पश्चिम आशियातील सद्य परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी भारत ‘संवाद आणि मुत्सद्देगिरी’वर भर देत असल्याचा पुनरुच्चार मोदी यांनी केला. जागतिक समृद्धीसाठी ‘सबका साथ, सबका विकास’ या सूत्राची गरज आहे, असेही ते म्हणाले.

हेही वाचा >>> कला इतिहासकार बी. एन. गोस्वामी यांचे निधन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

इस्रायलवर ७ ऑक्टोबरला करण्यात आलेल्या भयानक हल्ल्याचा आणि हमास-इस्रायल संघर्षांत नागरिकांचा बळी गेल्याबद्दल भारत तीव्र निषेध व्यक्त करतो, असे  मोदी म्हणाले. मोदी यांनी पॅलेस्टिनी प्रशासनाचे अध्यक्ष महमौद अब्बास यांच्याशी गेल्या महिन्यात झालेल्या दूरध्वनी संभाषणाचा संदर्भही या वेळी दिला. अब्बास यांच्याशी चर्चा झाल्यानंतर भारताने पॅलेस्टिनी नागरिकांना मानवतेच्या दृष्टिकोनातून मदत पाठवल्याचेही त्यांनी सांगितले. कन्सल्टेशन, कोऑपरेशन, कम्युनिकेशन, क्रिएटिव्हिटी आणि कपॅसिटी या ‘फाइव्ह सी’च्या रचनेनुसार  ‘एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य’ यासाठी आपण एकत्रित पुढे जाऊया, असे आवाहन मोदी यांनी केले. हमासने इस्रायलवर केलेल्या हल्ल्यात आतापर्यंत १४०० लोकांचा मृत्यू झाला आहे, तर इस्रायलने गाझापट्टीवर केलेल्या हल्ल्यांत सुमारे ११,५०० लोकांचा बळी गेला आहे.