पीटीआय, जगित्याल (तेलंगण)

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ‘शक्ती’च्या विरोधात संघर्ष करू असे विधान मुंबईतील सभेत रविवारी केले होते. त्याला पंतप्रधानांनी दक्षिणेकडील राज्यांमधील जाहीर सभांमध्ये उत्तर दिले. प्रत्येक महिला, मुलगी ही माझ्यासाठी शक्ती असून, आगामी निवडणूक ही शक्ती नष्ट करणारे विरुद्ध शक्तीच्या उपासकांमध्ये असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. तर पंतप्रधान खोटे बोलत असून, विधानाचा चुकीचा अर्थ लावत असल्याचे प्रत्युत्तर राहुल गांधी यांनी दिले.

विरोधकांच्या इंडिया आघाडीने जाहीरनाम्यातच शक्तीचा संहार करण्याचे जाहीर केले आहे. ते आव्हान आपण स्वीकारत असून, माता-भगिनींच्या संरक्षणासाठी आयुष्य पणाला लावू असे आव्हान पंतप्रधानांनी दिले. अध्र्या तासाच्या भाषणात पंतप्रधानांनी काँग्रेस तसेच भारत राष्ट्र समितीवर टीका केली.  आपण शक्तीचा उपासक असून, कोटय़वधी हिंदूंची ती देवता आहे. सार्वजनिक जीवनात कार्यप्रवण राहण्यासाठी या शक्तीमधूनच प्रेरणा मिळते असे पंतप्रधानांनी नमूद केले. देशातील प्रत्येक महिला शक्तीचे प्रतीक आहे. आमच्या सरकारने नारी शक्तीला प्राधान्य दिल्याचे मोदी यांनी नमूद केले. काँग्रेसला माता-भगिनी चोख प्रत्युत्तर देतील असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला. कर्नाटकमधील काँग्रेस सरकारवही त्यांनी टीका केली. राज्यात अनेक सत्ताकेंद्र असल्याची टीका पंतप्रधानांनी केली. दरम्यान भाजपचे ज्येष्ठ नेते ईश्वराप्पा हे कर्नाटकमधील शिवमोगा येथील पंतप्रधानांच्या सभेस गैरहजर राहीले. हावेरी मतदारसंघातून मुलाला उमेदवारी नाकारल्याने त्यांनी बंड केले आहे.

हेही वाचा >>>‘अजान’च्यावेळी मोठ्या आवाजात संगीत वाजविल्याने युवकाला मारहाण, तीन जणांना अटक

शिवसेनाप्रमुखांचा  आत्मा दुखावला असेल

तेलंगणपाठोपाठ कर्नाटकमधील शिवमोगा येथील सभेतही पंतप्रधानांनी हाच मुद्दा उपस्थित केला. शिवाजी पार्कवरून शक्ती संपवण्याची घोषणा केली जाते. यातून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आत्मा दुखावला असेल अशा शब्दात पंतप्रधानांनी इंडिया आघाडीवर टीकास्त्र सोडले. अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरे यांनाही पंतप्रधानांनी टोला लगावला. त्यावेळी व्यासपीठावर उद्धव उपस्थित होते. शिवसेनाप्रमुखांच्या आत्म्याला काय वाटेल असा सवालही पंतप्रधानांनी यावेळी केला.

भ्रष्टाचार, सत्तेच्या गैरवापराचा संदर्भ-राहुल गांधी

शक्तीच्या विरोधात संघर्ष हा भ्रष्टाचार तसेच सत्तेच्या गैरवापरविरोधात आहे. त्याला धार्मिक संदर्भ नाही असे स्पष्टीकरण काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दिले आहे. पंतप्रधानांनी चुकीचा अर्थ काढला असा आरोप राहुल गांधी केला. केंद्रीय संस्थांच्या गैरवापराविरोधात आमचा संघर्ष सुरु आहे. तो संदर्भ येथे होता असे राहुल यांनी समाजमाध्यमावरील प्रतिक्रियेत नमूद केले. काँग्रेसनेही पंतप्रधानांवर टीका केली. असुरी शक्तींवर राहुल गांधी यांनी हल्ला चढवला , यामुळे भाजप तसेच पंतप्रधान अस्वस्थ असल्याचा टोला काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेरा यांनी लगावला.