पीटीआय, दुर्गापूर (पश्चिम बंगाल)

पश्चिम बंगालमध्ये सत्ताधारी तृणमूल काँग्रेस पक्षाने मतपेढीच्या राजकारणासाठी घुसखोरीला प्रोत्साहन देऊन बंगाली अस्मिता आणि राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात आणली. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या सरकारने तुष्टीकरणाच्या राजकारणाच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी केला.

पश्चिम बंगालमध्ये ५,४०० कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते झाले. या वेळी सभेला संबोधित करताना ते म्हणाले, की ‘भाजप हा एकमेव असा पक्ष आहे जो बंगाली अस्मितेचा आदर करतो आणि त्यांचे रक्षण करतो. ज्या राज्यात भाजपचे सरकार आहे तिथे बंगाली लोकांचा आदर केला जातो.’ ‘पश्चिम बंगालसाठी भाजपची मोठी स्वप्ने आहेत. आम्हाला एक समृद्ध, विकसित बंगाल बनवायचा आहे. येथे सुरू होणारे सर्व प्रकल्प त्या स्वप्नाकडे जाणारे एक पाऊल आहेत.’

घुसखोरी, हिंसाचाराला चिथावणी आणि बंगालच्या युवकांचे पलायन या मुद्यांंवरून सत्तारूढ तृृणमूल काँग्रेसवर मोदी यांनी हल्लाबोल केला. तृणमूल काँग्रेसच्या काळात बंगालच्या आर्थिक स्थितीवर टीका करताना मोदी म्हणाले, की पश्चिम बंगाल हे उद्योग आणि गुंतवणूकदारांसाठी अयोग्य बनले आहे. येथील सत्ताधारी पक्षाचा ‘गुंडा कर’ बंगालमधील गुंतवणूक रोखत आहे. राज्याची संसाधने माफियांच्या हाती गेली असून, सरकारी धोरणे जाणूनबुजून मंत्र्यांना उघड भ्रष्टाचारात सहभागी होण्यास सक्षम करण्यासाठी तयार केली जात आहेत,’ असा आरोप त्यांनी केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बिहारमध्ये ७,२०० कोटींच्या प्रकल्पांचे उद्घाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी बिहारच्या पूर्व चंपारण जिल्ह्यात ७,२०० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन केले. हे प्रकल्प रेल्वे, मत्स्यव्यवसाय आणि इतर क्षेत्रांशी संबंधित आहेत. दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी मोतिहारी येथे एका जाहीर सभेला संबोधित करताना पंतप्रधानांनी ‘बनायेंगे नया बिहार, फिर एक बार एनडीए सरकार’ ही घोषणा दिली. तसेच पूर्व भारताच्या विकासासाठी बिहार अत्यंत महत्त्वाचा असल्याचे पंतप्रधान म्हणाले. बिहारच्या भूमीवरून ‘ऑपरेशन सिंदूर’ची शपथ घेतली होती आणि जगाने त्याचे यश पाहिले असल्याचे पंतप्रधानांनी या वेळी सांगितले.