“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांसाठी कोणत्याही शेतकरी नेत्यापेक्षा अधिक काम केले आहे.”, असे विधान भाजपाचे प्रमुख जेपी नड्डा यांनी सोमवारी केले. तसेच, विरोधी पक्षावर निशाणा साधत त्यांनी, त्यांचा लोकशाहीवर नव्हे तर कौटुंबिक राजवटीवर विश्वास असल्याचा आरोप केला.

गोरखपूर भागातील चंपा देवी पार्क येथील बुथ अध्यक्षांच्या अधिवेशनाला संबोधित करताना नड्डा कोणत्याही पक्षाचे नाव न घेता म्हणाले, “आम्ही सांस्कृतिक राष्ट्रवादासोबत आणि ते (विरोधक) ‘वंशवाद’ (वंशवादी राजकारण) सोबत पुढे जात आहेत. आमच्यासाठी राष्ट्रवाद महत्त्वाचा आहे आणि त्यांच्यासाठी ‘वंशवाद’ हेच सर्वस्व आहे.

“अनेक लोक शेतकर्‍यांचे नेते बनतात, पण शेतकर्‍यांसाठी जर कुणी काही केले असेल तर ते मोदी आहेत,” असे नड्डा यावेळी म्हणाले. पंतप्रधानांनी तीन कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केल्यानंतर भाजपावर टीका होत असताना नड्डा यांचं हे विधान समोर आलं आहे.

याचबरोबर, भाजपा ‘सबका साथ, सबका विश्वास’ हे ब्रीदवाक्य घेऊन सर्वांना सोबत घेऊन जात असताना, विरोधक मतपेटीचे राजकारण करतात आणि केवळ ‘विशेष समाज आणि कुटुंबाची’ चिंता करतात. “आम्ही प्रत्येकाच्या प्रगतीचा विचार करतो आणि ते त्यांच्या भावाचा आणि काकाचा विचार करतात. आता त्यांनी काकांबद्दलही विचार करणे सोडून दिले आहे,” असे नड्डा यांनी समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांच्यावर निशाणा साधताना म्हटले.