वॉशिंग्टन : भारत व अमेरिका यांच्या संबंधांचा नवा आणि गौरवशाली अध्याय सुरू झाला असून, जग आणखी चांगले बनवण्यासाठी दोन महान लोकशाही देश त्यांचे संबंध बळकट बनवत असल्याचे सारे जग पाहात आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या अमेरिका दौऱ्याच्या अखेरच्या टप्प्यात केले.
या दोन देशांमधील भागीदारीची पूर्ण क्षमता अद्याप प्रत्यक्षात आलेली नाही, असे येथील रोनाल्ड रेगन इमारत व आंतरराष्ट्रीय व्यापार केंद्रात शुक्रवारी भारतीय समुदायाच्या एका अत्यंत उत्साही मेळाव्याला संबोधित करताना मोदी म्हणाले. एकविसाव्या शतकात जग आणखी चांगले बनवण्यासाठी भारत व अमेरिकेची भागीदारी असल्याचे त्यांनी नमूद केले.
या दोन्ही देशांनी जागतिक मुद्दय़ांवर अभिसरणाचा अनुभव घेतला असून, त्यांचे वाढते संबंध ही ‘मेक इन इंडिया अँड मेक फॉर दि वल्र्ड’च्या प्रयत्नांसाठी चालना राहील, असे पंतप्रधान म्हणाले. तंत्रज्ञान हस्तांतरण, उत्पादनाला चालना आणि औद्योगिक पुरवठा साखळी मजबूत करणे याबाबत झालेल्या अनेक करारांचा त्यांच्या विधानाला संदर्भ होता.
भारत ही लोकशाहीची जननी असून, अमेरिका हा आधुनिक लोकशाहीचा कैवारी आहे आणि दोन महान लोकशाही देशांच्या संबंधांचे बळकटीकरण होताना जग पाहात आहे, असे मोदी यांनी सांगितले. दोन्ही देशांच्या संबंधांच्या खऱ्या क्षमतेच्या जाणिवेत मदत करण्यात भारतीय समुदाय मोठी भूमिका बजावेल आणि भारतात अधिकाधिक गुंतवणूक करण्यास हीच योग्य वेळ आहे, याचाही मोदी यांनी उल्लेख केला.
गूगलची १० अब्ज डॉलरची गुंतवणूक
इंटरनेट क्षेत्रातील मातब्बर कंपनी असलेली गूगल भारताच्या डिजिटायझेशन निधीत १० अब्ज अमेरिकी डॉलरची गुंतवणूक करणार असल्याचे कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सांगितले आहे. यामुळे, तंत्रज्ञान नवउद्यम क्षेत्रातील भारताच्या नेतृत्वाला मान्यता मिळणार असून भारत, अमेरिका व जगभरात लहान व मोठय़ा उद्योगांना मदत होणार आहे. पिचाई यांनी शुक्रवारी मोदी यांची भेट घेतली, तसेच गुजरातेतील आंतरराष्ट्रीय वित्त- तंत्रज्ञान शहर असलेल्या गांधीनगरमध्ये गूगलचे ‘ग्लोबल फिनटेक ऑपरेशन सेंटर’ उघडण्याची घोषणा केली.
‘मोदी यांच्या ऐतिहासिक अमेरिका दौऱ्यात त्यांना भेटणे ही माझ्यासाठी गौरवाची गोष्ट होती. गूगल भारताच्या डिजिटायझेशन निधीत १० अब्ज अमेरिकी डॉलरची गुंतवणूक करणार असल्याची माहिती आम्ही त्यांना दिली,’ असे पिचाई म्हणाले. मोदी यांचा डिजिटल इंडियाबाबत असलेला दृष्टिकोन सध्याच्या काळाच्या बराच पुढे असून, इतर देश जे करू इच्छितात त्यासाठी तो आराखडा असल्याचे मला वाटते, असेही त्यांनी नमूद केले.
‘भारतात गुंतवणूक करण्याची हीच योग्य वेळ’
वॉशिंग्टन : भारत व अमेरिका या दोन्ही देशांच्या सरकारांनी उद्योगांसाठी पाया रचलेला असल्यामुळे भारतात गुंतवणूक करण्याची हीच योग्य वेळ आहे. कंपन्यांनी या संधीचा फायदा घ्यावा, असे आग्रही प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेतील उद्योजकांना केले.
भारत-अमेरिका यांच्यातील भागीदारी सोयीपुरती नाही, तर आस्था, सामायिक बांधिलकी आणि अनुकंपा यांच्याशी संबंधित आहे, असे येथील केनेडी सेंटरमध्ये भारत व अमेरिकेतील उद्योजक आणि समाजसेवक तसेच भारतीय- अमेरिकी समुदायातील इतर प्रमुख लोकांना संबोधित करताना मोदी म्हणाले. भारतात सध्या सुरू असलेले परिवर्तन आणि विविध क्षेत्रांतील प्रगती अधोरेखित करून, पंतप्रधानांनी उद्योजकांना भारताशी भागीदारी करण्यास निमंत्रित केले.
‘निरनिराळय़ा क्षेत्रांतील आघाडीच्या उद्योजकांशी उपयुक्त चर्चा झाली. परराष्ट्र मंत्री ब्लिंकन हेही यात सहभागी झाल्याबद्दल आनंद झाला,’ असे ट्वीट मोदी यांनी केले.
आपल्या अमेरिका दौऱ्याच्या अखेरच्या तीन दिवसांमध्ये, द्विपक्षीय संबंध बळकट करण्यासाठी अनेक ऐतिहासिक पावले उचलण्यात आल्याचे मोदी म्हणाले. संरक्षण, हवाई वाहतूक, उत्पादन, माहिती तंत्रज्ञान व अवकाश यांसह इतर क्षेत्रांमध्ये भारत व अमेरिका विश्वासार्ह भागीदार म्हणून वाटचाल करत आहेत, असे पंतप्रधान मोदी यांनी अमेरिका- भारत स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप फोरमतर्फे आयोजित कार्यक्रमात सांगितले.
भारतीय शिकवणुकीचा जगावर प्रभाव – कमला हॅरिस
वॉशिंग्टन : भारताचा इतिहास आणि शिकवण यांनी जगावर प्रभाव पाडला असून त्याला आकार दिला आहे, असे अमेरिकेच्या उपाध्यक्ष कमला हॅरिस यांनी सांगितले. आपल्या तत्त्वज्ञानाच्या माध्यमातून भारताने जगातील कोटय़वधी लोकांना प्रेरणा दिली असेही त्या म्हणाल्या.
अमेरिकी विधिमंडळात भारतीय वंशाचे लोकप्रतिनिधी मोठय़ा संख्येत असल्यामुळे, भारतीय- अमेरिकी लोकांनी अमेरिकेत असामान्य प्रभाव पाडला आहे, असेही त्यांनी नमूद केले. भारत हा माझ्या आयुष्याचा अतिशय महत्त्वाचा भाग असून, माझे त्या देशाशी जिव्हाळय़ाचे संबंध आहेत याचा हॅरिस यांनी उल्लेख केला. ‘भारतातील इतिहास आणि शिकवण यांनी केवळ माझ्यावर प्रभाव पाडला आहे असे नव्हे, तर त्यांनी संपूर्ण जगाला आकार दिला आहे’, असे कमला हॅरिस व परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकन या दोघांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सन्मानार्थ शुक्रवारी आयोजित केलेल्या मेजवानीप्रसंगी केलेल्या भाषणात हॅरिस म्हणाल्या.
पंतप्रधान मोदी इजिप्तकडे रवाना
वॉशिंग्टन : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिकेचा राजकीय दौरा पूर्ण करून शनिवारी सकाळी इजिप्तकडे रवाना झाले. मोदींचा हा इजिप्तचा पहिला दौरा आहे. अमेरिकेच्या दौऱ्यादरम्यान त्यांनी अध्यक्ष जो बायडेन यांच्याबरोबर अनेक महत्त्वाच्या बाबींवर चर्चा केली. मोदी यांनी दौऱ्यात अमेरिकी काँग्रेसच्या (संसद) संयुक्त अधिवेशनात भाषण केले.
इजिप्तचे अध्यक्ष अब्देल फतेह अल-सीसी यांच्या निमंत्रणावरून मोदी हे इजिप्तच्या दोनदिवसीय दौऱ्यावर आहेत. १९९७ नंतर पहिल्यांदा भारतीय पंतप्रधानांचा हा इजिप्त दौरा आहे. मोदी हे अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन आणि जिल बायडेन यांच्या आमंत्रणावरून अमेरिका दौऱ्यावर गेले होते. त्यांच्या अमेरिका दौऱ्याला न्यू यॉर्कपासून सुरुवात झाली होती.
मोदी यांचे जोरदार स्वागत
कैरो : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इजिप्तच्या दोनदिवसीय शनिवारी दौऱ्याला सुरुवात झाली. ते इजिप्तचे अध्यक्ष अब्देल फतेह अल-सीसी यांच्याशी रविवारी द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. इजिप्तचे पंतप्रधान मुस्तफा मडबौली यांनी कैरो विमातळावर मोदींचे जोरदार स्वागत केले.