पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील नागरिकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मोदींनी हिंदीमध्ये ट्विट करत देशातील नागरिकांना दिवाळीनिमित्त शुभेच्छा देत तुमच्या आयुष्यामध्ये सुख, समाधान आणि संपन्नता येवो, अशी मी प्रार्थना करत असल्याचं मोदींनी म्हटलं आहे.

दिवाळीच्या पवित्र दिनानिमित्त मी देशातील नागरिकांना शुभेच्छा देतो. माझी इच्छा आहे की हे वर्ष तुमच्या सर्वांच्या आयुष्यामध्ये सुख, संपन्नता आणि सौभाग्य घेऊन येवो, असं मोदी ट्विटमध्ये म्हणाले आहेत. तसेच पुढे सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा असंही ट्विटरवरील संदेशामध्ये लिहिलं आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीसुद्धा दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. “सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. प्रकाश आणि आनंदाचं हे महापर्व सर्वांच्या आयुष्यात उर्जा, प्रकाश, आरोग्य आणि समृद्धीने उजळून निघू दे,” असं शाह यांनी म्हटलं आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी येणारी दिवाळी करोनामुक्तीची ठरेल असा विश्वास व्यक्त करत सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. येणारी दिवाळी सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि भरभराट घेऊन येवो असं गडकरींनी म्हटलं आहे.

काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनीही दिवाळीच्या शुभेच्छा दिल्यात. दिव्याचा प्रकाश कोणताही भेदभाव न करता प्रकाश देतो, हाच दिवाळीचा संदेश आहे. आपल्या सर्वांची दिवाळी एकमेकांशी भावनिक नातं निर्माण करणारी असो असं राहुल यांनी म्हटलं आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही ट्विटरवरुन सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्यात. “राज्यातील जनतेला ‘दिवाळी’च्या मनःपूर्वक शुभेच्छा! यंदाची दिवाळी सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी, समाधान, आनंद, उत्तम आरोग्य घेऊन येवो, ही दिवाळी करोना व प्रदुषण प्रतिबंधक नियमांचं पालन करुन आरोग्यदायी साजरी करुया. यंदाची दिवाळी राज्याला कोरोनामुक्तीकडे नेणारी ठरो,” असं अजित पवार म्हणाले आहेत.

यंदाही अनेक राज्यांनी करोनासंदर्भातील नियमांचं पालन करुनच दिवाळी साजरी करण्याचं आवाहन केलं आहे. महाराष्ट्रामध्येही दिवाळी पहाटच्या जास्त गर्दी होणाऱ्या कार्यक्रमांना परवानगी नाकारण्यात आली असून नवीन नियमावली जारी करत दिवाळीच्या कार्यक्रमांच्या आयोजनासंदर्भातील मार्गदर्शक तत्वांचं पालन करण्याचे आदेश जारी करण्यात आलेत.