पीटीआय, डेहराडून

उत्तराखंड सरकारने लोकसांख्यिकी बदल, समान नागरी कायदा, बेकायदा धर्मांतरबंदी आणि दंगलविरोधी उपाययोजना यासारखे धाडसी निर्णय घेतले आहेत, अशी प्रशंसा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी केली. उत्तराखंड राज्याच्या निर्मितीस २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अन्य राज्यांनीही मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांचा कित्ता गिरवावा असे मोदी यांनी यावेळी सूचित केले.

डेहराडूनमधील ‘वन संशोधन संस्थे’च्या विशाल मैदानावर आयोजित कार्यक्रमात पंतप्रधानांनी दूरदृश्य प्रणालीने सहभाग घेतला. यावेळी त्यांनी ८,२६० कोटींच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि शिलान्यास केला. त्यामध्ये पिण्याचे पाणी, सिंचन, तांत्रिक शिक्षण, ऊर्जा, शहर विकास, क्रीडा आणि कौशल्य विकास यासारख्या क्षेत्रांमधील प्रकल्पांचा समावेश आहे.

उत्तराखंडमधील जमिनी बळकावणे आणि लोकसांख्यिकीतील बदल यासारख्या संवेदनशील मुद्द्यांवर राज्य सरकार ठोस पावले उचलत असल्याची प्रशंसा मोदी यांनी केली. राज्यात ऋषिकेश-कर्णप्रयाग रेल्वे प्रकल्प आणि दिल्ली-डेहराडून द्रुतगती मार्ग यासारखे दोन लाख कोटींचे प्रकल्प सुरू आहेत, असेही त्यांनी सांगितले.

“राज्याच्या विकासात येणारे सर्व अडथळे धामी सरकारने दूर केले, तसेच विकासाचा वेगही कायम राखला. आगामी काही वर्षांमध्ये उत्तराखंड हे जगाची आध्यात्मिक राजधानी म्हणून स्वतःला प्रस्थापित करू शकेल,” असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला. राज्याच्या विकासासाठी केंद्र सरकार सर्व मदत करेल असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

धामी सरकारने ज्या गांभीर्याने समान नागरी कायद्याची अंमलबजावणी केली आहे ते अन्य राज्यांसाठी उदाहरण आहे. राज्य सरकारने राष्ट्रीय हिताच्या मुद्द्यांवर धाडसी धोरणे राबवली आहेत.- नरेंद्र मोदी, पंतप्रधान