scorecardresearch

जागतिक अर्थव्यवस्थेत भारत ‘तेजस्वी बिंदू’; इंदूरमधील गुंतवणूकदार परिषदेत पंतप्रधानांचे वक्तव्य

आंतरराष्ट्रीय नाणेनिधी जागतिक अर्थव्यवस्थेत भारताकडे एक ‘तेजस्वी बिंदू’ म्हणून पाहतो आणि जागतिक बँकेच्या मते, जगातील विपरीत परिस्थितीचा सामना करण्यात भारत हा इतर अनेक देशांपेक्षा अधिक चांगल्या स्थितीत आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी सांगितले.

जागतिक अर्थव्यवस्थेत भारत ‘तेजस्वी बिंदू’; इंदूरमधील गुंतवणूकदार परिषदेत पंतप्रधानांचे वक्तव्य
पंतप्रधान नरेंद्र मोदी (संग्रहित छायाचित्र)

पीटीआय, इंदूर

आंतरराष्ट्रीय नाणेनिधी जागतिक अर्थव्यवस्थेत भारताकडे एक ‘तेजस्वी बिंदू’ म्हणून पाहतो आणि जागतिक बँकेच्या मते, जगातील विपरीत परिस्थितीचा सामना करण्यात भारत हा इतर अनेक देशांपेक्षा अधिक चांगल्या स्थितीत आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी सांगितले.भारताच्या बळकट अशा ‘व्यापक आर्थिक मूलभूत बाबींमुळे’ असे घडले आहे, असे इंदूर येथील सातव्या मध्य प्रदेश- जागतिक गुंतवणूकदार परिषदेच्या उद्घाटन कार्यक्रमाला आभासी संबोधित करताना मोदी म्हणाले. ‘मध्य प्रदेश- भविष्यासाठी सज्ज असलेले राज्य’ अशी या दोन दिवसांच्या परिषदेची संकल्पना आहे.

गेल्या आठ वर्षांत सरकारने सुधारणांची गती वाढवली असून, गुंतवणुकींच्या मार्गातील अनेक अडथळे दूर केले आहेत. आजचा भारत खासगी क्षेत्राच्या ताकदीच्या आधारे पुढे वाटचाल करत आहे, असेही पंतप्रधानांनी सांगितले. भारताने संरक्षण, खाणकाम व अंतराळ यांसारखी महत्त्वाची क्षेत्रे खासगी क्षेत्रासाठी खुली केल्याचा त्यांनी उल्लेख केला.

बळकट अशी लोकशाही, तरुणांची मोठी संख्या आणि राजकीय स्थैर्य यातून भारताचा आशावाद बळावला आहे. यामुळे, ‘राहण्यास योग्य’ आणि ‘उद्योगस्नेही’ वातावरण यांना प्रोत्साहन देणारे निर्णय भारत घेत आहे, असे मोदी यांनी नमूद केले. स्मार्टफोनच्या डेटा वापरात भारत जगात पहिल्या क्रमांकावर आहे. देशात विक्रमी प्रमाणात थेट परदेशी गुंतवणूक होत आहे, याचाही त्यांनी आवर्जून उल्लेख केला.

विकसित भारताची उभारणी करण्यात मध्य प्रदेशची महत्त्वाची भूमिका आहे. श्रद्धा व आध्यात्मिकतेपासून पर्यटनापर्यंत, तसेच शेतीपासून शिक्षण आणि कौशल्य विकासापर्यंत मध्य प्रदेश ‘अजब, गजब आणि सजग’ आहे. मध्य प्रदेशात गुंतवणूकदारांच्या विकासाची क्षमता, निर्धार आणि इच्छा असल्याचे मी आत्मविश्वासाने सांगू शकतो, असेही पंतप्रधानांनी नमूद केले.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 12-01-2023 at 02:41 IST

संबंधित बातम्या