पीटीआय, जयपूर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी संध्याकाळी जयपूरमधील ऐतिहासिक जंतरमंतरवर फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्राँ यांचे स्वागत केले. पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष मॅक्राँ यांनी हस्तांदोलन केले आणि एकमेकांना मिठी मारली. यानंतर दोन्ही नेत्यांनी ऐतिहासिक जंतरमंतरला भेट देऊन तेथील माहिती जाणून घेतली.

२६ जानेवारी रोजी दिल्लीत होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या समारंभात मॅक्राँ हे प्रमुख पाहुणे आहेत. तत्पूर्वी, मॅक्राँ विशेष विमानाने थेट जयपूरला पोहोचले. राज्यपाल कलराज मिश्रा, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी मॅक्राँ यांचे विमानतळावर स्वागत केले. मॅक्राँ यांचा ताफा विमानतळावरून आमेर किल्ल्याकडे रवाना झाला. मार्गात ठिकठिकाणी शाळकरी मुले व सर्वसामान्य नागरिकांनी ताफ्याचे स्वागत केले. अनेक ठिकाणी मुलांनी हस्तांदोलन करून मॅक्राँ यांचे स्वागत केले.

हेही वाचा >>>Padma awards 2024 : व्यंकय्या नायडूंना पद्मविभूषण, राम नाईक यांना पद्मभूषण; वाचा संपूर्ण यादी

आमेर किल्ल्यातही मॅक्राँ उपस्थित लोकांशी गप्पा मारताना आणि त्यांच्याबरोबर फोटो काढताना दिसले. परराष्ट्रमंत्री जयशंकर आणि राजस्थानच्या उपमुख्यमंत्री दिया कुमारीही किल्ल्यात उपस्थित होत्या. येथे मॅक्राँ यांनी एक सांस्कृतिक कार्यक्रमही पाहिला. दरम्यान, पंतप्रधान मोदी नंतर बुलंदशहरहून जयपूरला पोहोचले. राज्यपाल कलराज मिश्रा आणि मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी विमानतळावर त्यांचे स्वागत केले. विमानतळावरून मोदी जयपूरच्या उद्यानात असलेल्या जंतरमंतरला रवाना झाले. त्यांच्या स्वागतासाठी मार्गात ठिकठिकाणी लोक व शाळकरी मुले उभी होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जंतरमंतर ते हवा महल रोड शो

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्राँ यांनी गुरुवारी येथील जंतरमंतर ते हवा महलपर्यंत रोड शो केला. रोड शो दरम्यान पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष मॅक्राँ एका ओपन-टॉप वाहनात उभे होते. दोन्ही नेत्यांनी रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असलेल्या जनसमुदायाचे अभिवादन स्वीकारले. लोकांनी ‘मोदी मोदी’च्या घोषणाही दिल्या. त्याच्यावर अनेक ठिकाणी फुलांचा वर्षांव करण्यात आला.