जम्मू : काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी रविवारी पहिला मेळावा घेऊन नवीन पक्षाची ध्येयधोरणे जाहीर केली. यामध्ये जम्मू-काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा देणे, राज्यातील नागरिकांच्या भूमी आणि रोजगाराच्या अधिकारांचे रक्षण तसेच काश्मिरी पंडितांच्या पुनर्वसनाचा मुद्दा प्रमुख असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जम्मू आणि काश्मीरमधील नागरिकच आपल्या नव्या पक्षाचे नाव सुचवतील, असे जम्मूजवळच्या सैनिक वसाहतीतील मेळाव्यात आझाद यांनी सांगितले. जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री असलेल्या आझाद यांचे त्यांच्या समर्थकांनी जम्मू विमानतळावर जोरदार स्वागत केले. त्यानंतर त्यांना मेळाव्याच्या ठिकाणी मिरवणुकीने नेण्यात आले.

आझाद यांच्यासोबत मंचावर माजी उपमुख्यमंत्री तारा चंद, त्यांच्या समर्थनार्थ काँग्रेसमधून बाहेर पडलेले अनेक माजी मंत्री, आमदार आणि पीडीपीचे आमदार सैय्यद बशीर, माजी आमदार शोएब नबी लोन उपस्थित होते.

आझाद यांनी या वेळी सांगितले की, त्यांचा नवीन पक्ष जम्मू-काश्मीरचा पूर्ण राज्याचा दर्जा पुन्हा मिळवून देण्यासह, नागरिकांसाठी भूमी आणि नोकऱ्यांचा अधिकार सुरक्षित करण्यासह काश्मिरी पंडितांच्या पुनर्वसनावर लक्ष केंद्रित करणार आहे.

आझाद यांनी काँग्रेससोबतचे पाच दशकांचे संबंध २६ ऑगस्ट रोजी तोडले होते.

काँग्रेस आमच्या कष्टाचे फलित

काँग्रेस संगणक, ट्विटरद्वारे तयार झाली नसून रक्त आणि घामाचे हे फलित आहे. काँग्रेस पक्ष आम्ही तयार केला आहे. मी कुणाचेही वाईट चिंतित नाही. मी घरातून संगणक चालवणाऱ्यांपैकी नाही. माझी पाळेमुळे ही सर्वसामान्यांबरोबर जोडलेली आहेत, असे गुलाम नबी आझाद यांनी सांगितले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Priority for full statehood to jammu and kashmir says ghulam nabi azad zws
First published on: 05-09-2022 at 03:11 IST