काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना हिंमत असेल तर नोटाबंदी, जीएसटीवर निवडणूक लढवून दाखवा असं आव्हान दिलं आहे. लोकसभा निवडणुकीसाठी जोरदार प्रचार सुरु असून एकीकडे नरेंद्र मोदी गांधी कुटुंबावर सतत टीका करत असताना दुसरीकडे प्रियंका गांधीदेखील जोरदार प्रत्युत्तर देत आहेत. नरेंद्र मोदी यांनी राजीव गांधी यांचा भ्रष्टाचारी असा उल्लेख केल्यानंतर प्रियंका गांधी यांनी मोदींना दुर्योधन म्हटलं होतं.

‘एक दिल्लीची मुलगी तुम्हाला खुलं आव्हान देत आहे. निवडणुकीच्या शेवटच्या दोन टप्प्यात नोटाबंदीवर लढा, जीएसटीवर लढा, महिलांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर लढा आणि देशातील तरुणांना तुम्ही जी खोटी आश्वासनं दिलीत त्यावर लढा, जी फसवणूक केलीत त्यावर लढून दाखवा’, असं प्रियंका गांधींनी म्हटलं आहे.

अभ्यास न करता शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांसारखी त्यांची परिस्थिती आहे असा टोलाही यावेळी त्यांनी लगावला. ‘त्यांची परिस्थिती अभ्यास न करता शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांसारखी झाली आहे. जेव्हा शिक्षक विचारतात तेव्हा सांगतात, काय करु नेहरुजींना माझा कागद घेतला आणि लपवला. इंदिरा गांधींनी मी अभ्यास केलेल्या कागदाची बोट बनवली आणि पाण्यात बुडवली’, अशी उपहासात्मक टीका प्रियंका गांधी यांनी केली आहे.