नवी दिल्ली : ‘‘इस्रायल पॅलेस्टाइनमध्ये नरसंहार करीत असून, केंद्र सरकारचे यावरील मौन हा एकप्रकारे इस्रायल करीत असलेल्या गुन्ह्याला चालना देण्याचा प्रयत्न आहे. असा प्रयत्न होणे हादेखील गुन्हाच आहे,’’ या शब्दांत काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांनी भाजपला मंगळवारी लक्ष्य केले. इस्रायलचे भारतातील राजदूत रूवन अझर यांनी प्रियांका यांच्या टिप्पणीवर ‘‘हमासने दिलेल्या आकड्यांवर विश्वास ठेवू नका’’, असे उत्तर दिले.
प्रियांका गांधी म्हणाल्या, ‘‘इस्रायलने ६० हजारांहून अधिक लोकांची हत्या केली आहे. त्यातील १८,४३० मुले आहेत. शेकडो लोक भुकेने मृत्युमुखी पडली आहेत. त्यात अनेक मुलांचाही समावेश आहे. लक्षावधी लोकांना उपासमारीचा धोका आहे. मौन धारण करून आणि त्यावर काहीही न करता अशा कृतींना प्रोत्साहन देणे हा एक गुन्हाच आहे. ही अतिशय लज्जास्पद बाब आहे.’’
‘एक्स’वरील अन्य एका पोस्टमध्ये प्रियांका गांधी यांनी इस्रायलने पत्रकारांच्या केलेल्या हत्यांवर टीका केली. त्यांनी लिहिले की, ‘अल जझीरा या वृत्तसंस्थेच्या पाच पत्रकारांची पॅलेस्टाइनच्या भूमीवर थंड डोक्याने केलेली हत्या हाही एक गंभीर गुन्हा आहे. इस्रायलच्या हिंसा आणि द्वेषापुढे सत्य बोलणाऱ्यांचे अमाप साहस कधीही ढळणार नाही. सत्य पत्रकारिता काय असते, हे या शूर पत्रकारांनी दाखवून दिले.
प्रियांका गांधी यांना उत्तर देताना इस्रायलचे भारतातील राजदूत रूवन अझर यांनी ‘एक्स’वर टिप्पणी केली. त्यांनी लिहिले की, “ही जाणीवपूर्वक केलेली लज्जास्पद दिशाभूल आहे. इस्रायलने हमासच्या २५ हजार दहशतवाद्यांना मारले. हमासच्या दहशतवाद्यांनी सामान्य नागरिकांच्या आड लपून बसण्याची अवलंबिलेली नीती, सुरक्षित स्थळी जाणाऱ्यांवर केलेला गोळीबार आणि त्यांनी केलेले रॉकेटचे हल्ले यांमुळे मृतांची संख्या जास्त आहे. इस्रायलने गाझा पट्टीत २० लाख टन अन्नधान्याची सोय केली. मात्र, हमासने हे अन्नधान्यही हडपले. त्यामुळे तिथे उपासमारीची स्थिती आहे. गेल्या ५० वर्षांत गाझामधील लोकसंख्या ४५० टक्क्यांनी वाढली. तेथे कुठलाही नरसंहार होत नाही. हमास देत असलेल्या आकड्यांवर विश्वास ठेवू नका.’’