Priyanka Gandhi on Supreme Court’s Remark on Rahul Gandhi : चीनने भारतीय भूमीत घुसखोरी केली असून आपला बराचसा भूभाग बळकावला असल्याचा दावा लोकसभेचे विरोधी पक्षनेते तथा काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला होता. त्यावरून सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधी यांची कानउघडणी केली आहे. “चीनने भारताचा भूभाग गिळंकृत केला याचे विश्वासार्ह पुरावे तुमच्याकडे आहेत का? पुरावे नसतील तर तुम्ही अशी वक्तव्ये का करता? तुम्ही खरे भारतीय असाल तर अशी विधाने करणार नाहीत”, अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी (४ ऑगस्ट) राहुल गांधी यांना खडे बोल सुनावले. परंतु, त्यांच्याविरोधातील फौजदारी मानहानीच्या खटल्याची कार्यवाही स्थगित केली.

सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधी यांना सुनावल्यानंतर भारतीय जनता पार्टी व राष्ट्रीय लोकशाही आघाडीमधील (एनडीए) अनेक पक्षांचे नेते राहुल यांच्यावर तोंडसुख घेऊ लागले आहेत. अशातच, राहुल यांची थोरली बहीण व काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी या राहुल यांच्या बचावासाठी पुढे आल्या आहेत. प्रियांका गांधी म्हणाल्या, “राहुल गांधी हे लोकसभेचे विरोधी पक्षनेते असून सरकारला प्रश्न विचारण्याचं त्यांचं कर्तव्य चोखपणे पार पाडत आहेत.”

प्रियांका गांधी नेमकं काय म्हणाल्या?

प्रियांका गांधी यांनी काही वेळापूर्वी संसदेच्या आवारात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्या म्हणाल्या, “कोण खरा भारतीय आहे हे सर्वोच्च न्यायालय ठरवू शकत नाही. सरकारला प्रश्न विचारणं हे विरोधी पक्षनेत्याचं काम आहे आणि राहुल गांधी हे स्वतःची जबाबदारी नीट पार पाडत आहेत. तसेच माझा भाऊ भारतीय लष्कराच्या विरोधात काही बोलूच शकत नाही.”

नेमकं प्रकरण काय?

२०१७ पासून चीनी सैन्य सातत्याने भारतीय हद्दीत घुसण्याचा प्रयत्न करत आहे. या कारवायांसंदर्भात राहुल गांधींनी २०२२ च्या डिसेंबर महिन्यात एक वक्तव्य केलं होतं.‘भारत जोडो यात्रे’च्या माध्यमातून ते देशभर भ्रमण करत होते. त्यावेळी एका भाषणात बोलताना राहुल गांधींनी ‘चीनी सैनिक भारतीय जवानांना अरुणाचलमध्ये झोडपून काढत आहेत आणि प्रसारमाध्यमं यासंदर्भात काहीही दाखवणार नाहीत’, अशी टिप्पणी केली होती. यावरून त्यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली होती. यासंदर्भात राहुल गांधींविरोधात न्यायालयात याचिकादेखील दाखल करण्यात आली होती. या याचिकेवरील सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने त्यांना कठोर शब्दांत सुनावलं आहे.