“सत्ताधाऱ्यांनी केलेल्या सगळ्या भाषणांतून सुटलेली गोष्ट म्हणजे पहलगाम हल्ला का आणि कसा झाला”, असं म्हणत काँग्रेस खासदार प्रियांका गांधी यांनी नरेंद्र मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान लोकसभेत पहलगाम हल्ला व त्यापाठोपाठ राबवण्यात आलेले ऑपरेशन सिंदूर यावर सविस्तर चर्चा चालू आहे. या चर्चेदरम्यान प्रियांका गांधींनी मोदी सरकारवर परखड शब्दांत टीकास्र सोडलं. तसेच, पर्यटक पहलगामला सरकारच्या भरवश्यावर गेले होते, पण सरकारनं त्यांना देवाच्या भरवश्यावर सोडून दिलं, असंही त्या म्हणाल्या.

“कालपासून मी सत्ताधाऱ्यांची भाषणं ऐकते आहे. संरक्षण मंत्र्यांनी तासाभराचं भाषण केलं. पण त्या सगळ्यांच्या भाषणातून एक गोष्ट सुटली. २२ एप्रिल रोजी जेव्हा २६ भारतीयांना त्यांच्या कुटुंबीयांसमोर जीवे मारलं गेलं, तो हल्ला कसा झाला? का झाला? हे दहशतवादी तिथे कसे आले? आजकाल प्रचाराचं युग आहे. आपलं सरकार गेल्या काही काळापासून जाहिरातबाजी करत आहे की काश्मीरमध्ये सगळं काही व्यवस्थित झालं आहे. पण त्याचदरम्यान पहलगाममध्ये हल्ला झाला”, असं प्रियांका गांधी आपल्या भाषणाच्या सुरुवातील म्हणाल्या.

तिथे एकही सैनिक सुरक्षेसाठी नव्हता – प्रियांका गांधी

दरम्यान, पहलगाम हल्ल्यावेळी पर्यटकांच्या सुरक्षेसाठी तिथे एकही सैनिक किंवा पोलीस नव्हता, असं प्रियांका गांधी म्हणाल्या. यासाठी त्यांनी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेले शुभम द्विवेदी यांच्या पत्नीने दिलेल्या प्रतिक्रियेचा संदर्भ दिला. “एक तास हे दहशतवादी तिथे बेफामपणे सगळ्यांना मारत होते. यादरम्यान तिथे एकही सुरक्षारक्षक नव्हता. देशाने, सरकारने आम्हाला तिथे अनाथ सोडून दिलं होतं”, ही द्विवेदींच्या पत्नीची प्रतिक्रिया प्रियांका गांधींनी वाचून दाखवली.

“सरकारला तिथल्या परिस्थितीबाबत माहिती नव्हतं? हे लोक तिथे सरकारच्या भरवश्यावर गेले, आणि सरकारनं त्यांना तिथे देवाच्या भरवश्यावर सोडून दिलं. या नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी कुणाची होती? पंतप्रधान, गृहमंत्र्यांची, संरक्षण मंत्र्यांची नव्हती का?” असा जाबही प्रियांका गांधींनी सरकारला विचारला आहे.

पहलगाम हल्ल्याच्या दोन आठवडे आधी गृहमंत्र्यांचा दौरा

दरम्यान, यावेळी बोलताना प्रियांका गांधींनी हल्ल्याच्या दोन आठवडे आधी गृहमंत्री अमित शाह यांनी केलेल्या पहलगाम दौऱ्याचाही दाखला दिला. “पहलगामच्या फक्त दोन आठवडे आधी गृहमंत्री तिथे सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी गेले होते. ते तिथे म्हणाले होते की आता दहशतवादावर विजय मिळाला आहे. हल्ल्याच्या तीन आठवड्यांनंतर जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल एका ठिकाणी सहज म्हणाले की तिथे घडलेल्या गोष्टींमध्ये खूप दुर्लक्ष झालं होतं आणि त्याची जबाबदारी मी घेतो. पण ते तिथेच संपून जातं. त्यांना कुणी काही विचारत नाही, ते कुणाला काही उत्तरही देत नाही”, असं प्रियांका गांधी म्हणाल्या.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“त्या हल्ल्याची जबाबदारी टीआरएफनं घेतली. २०१९ साली हा गट तयार झाला. २०२० मध्ये त्यानं काश्मीरमध्ये कारवाया सुरु केल्या. एप्रिल २०२० ते २२ एप्रिल २०२५ पर्यंत त्यांनी भारतात २५ दहशतवादी हल्ले केले. गृहमंत्र्यांनी आपल्या भाषणात यूपीए सरकारच्या काळातील दहशतवादी हल्ल्यांची संख्या २५ सांगितली. पण या गटानं २०२० ते २०२५ पर्यंत २५ हल्ले केले. या हल्ल्यांमध्ये टीआरएफने ४१ सुरक्षा कर्मचारी, २७ नागरिकांची हत्या केली. ५४ लोकांना जखमी केलं. पण भारत सरकारने टीआरएफला २०२३ मध्ये दहशतवादी संघटना ठरवलं. तीन वर्षं ते मोकाटपणे दहशतवादी कारवाया करत होते”, अशा शब्दांत प्रियांका गांधींनी मोदी सरकारला लक्ष्य केलं.